Join us  

मुंबईकरांना दिलासा, रिक्षा-टॅक्सी संप स्थगित; भाडेवाढीबाबत सरकार निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 8:08 AM

मंत्रालयात मंगळवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मुंबई टॅक्सी मेन्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

मुंबई : सीएनजीच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळावी या मागणीसाठी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने १५ सप्टेंबरपासून पुकारलेला बंद तूर्तास मागे घेतला.

मंत्रालयात मंगळवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मुंबई टॅक्सी मेन्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामंत यांना ही बैठक घेण्यास सांगितले होते. भाववाढीबाबत बैठकीत निर्णय झाला नाही. मात्र, याबाबत लवकरच मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे युनियनने येत्या १५ सप्टेंबरपासून पुकारलेला संप तूर्तास मागे घेतला आहे.

गेल्या वर्षभरात सीएनजीच्या दरात सुमारे ३२ रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, टॅक्सीच्या भाड्याचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे रिक्षा, टॅक्सीचालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे टॅक्सी संघटनांनी किमान टॅक्सी भाडे २५ रुपयांवरून ३५ रुपये करण्याची मागणी केली आहे.

खटुआ समितीच्या निर्देशानुसार महागाई निर्देशांक तपासून रिक्षा, टॅक्सीचालकांना भाडेवाढ देण्यात यावी, अशी संघटनांची मागणी आहे. याबाबत उद्योगमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. भाडेवाढीबाबत निर्णय घेण्यासाठी सामंत यांनी दहा दिवसांचा कालावधी मागितला आहे. - ए. एल. क्वाड्रोस, सरचिटणीस, टॅक्सीमेन्स युनियन

रिक्षा-टॅक्सी महामंडळ स्थापन करण्याबाबत येत्या दहा दिवसांत रूपरेषा तयार करण्यासाठी बैठक घेण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी महामंडळाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उद्योगत्र्यांनी दिले आहे. दिवाळीत रिक्षा-टॅक्सीचालकांना खुशखबर मिळेल.  - के. के. तिवारी, अध्यक्ष, भाजप-रिक्षा टॅक्सी सेल

टॅग्स :ऑटो रिक्षाटॅक्सीएकनाथ शिंदे