Join us

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला आठवड्याभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांचा मराठा विद्यार्थ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 10:17 PM

कॉलेज निवडण्यासाठी राज्य सरकारकडून मुदतवाढ

मुंबई: वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं काहीसा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या निवडीसाठी देण्यात आलेली मुदत एका आठवड्यानं वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या बैठकीला भाजपाचे आमदार प्रवीण दरेकरदेखील उपस्थित होते. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उद्यापर्यंत महाविद्यालयाची निवड करावी लागणार आहे. मात्र यामुळे मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असल्यानं ही मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची निवड करण्यासाठी अजून एक आठवडा मिळाला आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं समाजाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेताना अडचणी येत आहेत. या अडचणी लवकरात लवकर दूर व्हाव्यात, यासाठी विद्यार्थी आठवड्याभरापासून आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. आज संध्याकाळी गिरीश महाजन यांनी आझाद मैदानातल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री स्वत: या प्रकरणात लक्ष घालत असल्याचं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं. महाविद्यालयाची निवड करण्यासाठी आलेली मुदत वाढवून देण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्यानुसार महाविद्यालयाच्या निवडीसाठी आठवड्याभराची मुदतवाढ देण्यात आली. या प्रकरणी अध्यादेश आणण्याचा विचार फडणवीस सरकारकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र आचारसंहिता सुरू असल्यानं त्यात अडथळे येत आहेत. 

टॅग्स :मराठावैद्यकीयविद्यार्थी