कामगार आयुक्त कार्यालयामार्फत उपाययोजना; सीएसएमटी, एलटीटी, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, दादर, ठाणे येथे नास्त्याची पाकिटे, पाण्यासह गरजेच्या वस्तूंचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाकाळात स्थलांतरित कामगारांना मदत करण्यात येत असून, कामगार आयुक्त कार्यालयामार्फत विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. सीएसएमटी, एलटीटी, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, दादर, ठाणे येथे नास्त्याची पाकिटे, पाण्यासह गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.
कोरोनाकाळात आंतरराज्य स्थलांतरित कामगार, असंघटित कामगार, स्वयंरोजगारित कामगार इत्यादींच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने कामगार आयुक्त कार्यालयामार्फत अनेक उपाययोजना करण्यात आल्या असून, त्याअनुषंगाने अपर कामगार आयुक्त, कोकण विभाग या कार्यालयामार्फत वेगाने काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार, सीएसएमटी, एलटीटी, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, दादर, ठाणे इत्यादी प्रमुख रेल्वेस्थानके ज्या ठिकाणावरून परराज्यात जाणाऱ्या गाड्या सुटतात अशा रेल्वेस्थानकांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांना स्थलांतरित कामगारांची माहिती घेऊन मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याबाबतचे बॅनर रेल्वेस्थानकाच्या दर्शनी भागात लावले आहेत. सहाय्यता कक्षामार्फत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध सामाजिक संघटना, कामगार संघटना, व्यवस्थापन संघटना यांच्या सहकार्यातून नास्त्याची पाकिटे, पाण्यासह इतर गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
कामगार आयुक्त कार्यालयामार्फत राज्यस्तरावर, विभागस्तरावर व जिल्हा कार्यालय या ठिकाणी स्थलांतरित कामगारांच्या मदतीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कामगार आयुक्तालयांतर्गत कार्यरत जिल्हा कार्यालयामध्ये तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यालय स्तरावर सुरू करण्यात आलेले तक्रार निवारण कक्ष आठवड्यातील सातही दिवस कार्यरत आहेत. सदर कक्षांमार्फत तक्रारीच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करण्यात येत आहे.
* सर्वताेपरी मदतीचे प्रयत्न
कामगारांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी पाहता मागील लॉकडाऊननंतर अद्यापपर्यंत ६,८०२ तक्रारी हाताळण्यात आल्या असून, २४ कोटी १४ लाखांपर्यंत कायदेशीर देणी, वेतन हे तक्रारदार कामगारांना मिळवून देण्यात आले आहे. अशाप्रकारे कोकण विभागामार्फत असंघटित कामगारांकरिता शक्य होतील तितक्या सर्वताेपरी मदतीचे प्रयत्न सुरू आहेत.
- शिरीन लोखंडे, अपर कामगार आयुक्त
----------------
- स्थलांतरित कामगार मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात.
- ९० टक्के आंतरराज्यीय स्थलांतरित कामगार हे असंघटित, स्वयंरोजगारित स्वरुपाचे काम करतात.
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत कोकण विभागात ७० हजार नोंदीत बांधकाम कामगार आहेत.
- मुंबई, ठाणे, पालघर येथे बांधकाम कामगारांसाठी माध्यान्ह भोजन सुरू आहे. ४० हजार कामगारांना दररोज माध्यान्ह भोजन देण्यात येत आहे.
- सध्याची कोरोना स्थिती पाहता २५ हजार बांधकाम कामगारांना रात्रीचे मोफत भोजनही पुरविण्यात येत आहे.
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी प्रत्येकी १ हजार ५०० रुपये आर्थिक साहाय्याची घोषणा करण्यात आली असून त्यांच्या बँक खात्यावर हा निधी जमा करण्यात येणार आहे.
* अपर कामगार आयुक्त, कोकण विभाग या कार्यालयांतर्गत येणारे जिल्हे
मुंबई जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
----------------