मुंबईकरांना दिलासा! सर्व लोकल लवकरच १५ डब्यांच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:54 AM2018-11-30T05:54:06+5:302018-11-30T05:54:14+5:30
पश्चिम, मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर चाचणी : अहवाल देण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या सूचना
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेवरील प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता या मार्गावरील सर्व गाड्या १५ डब्यांच्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांंनी याबाबत बुधवारी रेल्वे प्रशासनाला सूचना दिल्या असून याबाबत पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे उपनगरीय सेवेच्या प्रवासी वहन क्षमतेमध्ये २५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला पश्चिम व मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर या लोकल धावतील. या मार्गावर या १५ डबा लोकलची चाचणी घेण्यात आल्यानंतर व त्याच्या यशस्वीतेनंतर टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवर या लोकल धावतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
गर्दीचे नियोजन होणार सोपे
प्रचंड गर्दीमुळे लोकलचा प्रवास अनेकदी जीवघेणा होतो. प्रवासी अक्षरश: स्वत:ला गाडीत कसबसे कोंबून घेत प्रवास करतात. यामुळे अपघात घडतात. यावर उपाय म्हणून सर्व लोकलचे डबे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा असल्याने रेल्वे प्रशासनाला गर्दीचे नियोजन करणे सोपे होणार आहे. शिवाय यामुळे प्रवाशांनाही दिलासा मिळणार असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आले.
सध्या मध्य रेल्वेकडे १५ डब्यांची एक लोकल आहे. तर पश्चिम रेल्वेकडे ५ लोकल आहेत. दर दिवसाला त्यांच्या ५४ फेºया होतात.
१२ डब्यांच्या गाडीतून एका वेळेस ३ हजार प्रवासी प्रवास करू शकतात, तर गर्दीच्या वेळी सुमारे साडेपाच हजार प्रवासी प्रवास करतात.
१५ डब्यांच्या एका गाडीची क्षमता ४२०० आहे. यामधून गर्दीच्या वेळी ७ हजार प्रवासी प्रवास करू शकतात.
नेरळ-माथेरान शटल सेवेत दोन अतिरिक्त डबे
मुंबई : माथेरानला जाणाºया पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे नेरळ अमन लॉज ते माथेरान या मार्गावरील शटल सेवेचा विस्तार करण्यात येणार असून प्रत्येक गाडीला द्वितीय श्रेणीचे दोन अतिरिक्त डबे जोडण्यात येतील. यामुळे सध्याच्या ६ डब्यांची ही शटल सेवा आता ८ डब्यांची होईल. शुक्रवारपासून हे अतिरिक्त डबे जोडण्यात येतील. तसेच नेरळ ते माथेरान या मार्गावर शनिवार (१ डिसेंबर) व रविवार (२ डिसेंबर) या दिवशी विशेष मिनी ट्रेन धावतील.
गाडी क्रमांक ५२१०३ ही मिनी ट्रेन नेरळ येथून सकाळी ९ वाजता सुटेल व माथेरानला ११ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. त्२ार, गाडी क्रमांक ५२१०४ ही माथेरान येथून दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सुटेल व नेरळ येथे सायंकाळी ५ वाजता पोहोचेल.
शटल सेवेच्या नवीन ८ डब्यांमध्ये एक प्रथम श्रेणीचा डबा असेल. याशिवाय, द्वितीय श्रेणीचे पाच डबे, दोन जनरल क्लास व दोन गार्ड तसेच एक ब्रेक व्हॅन असेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.