Join us

एकनाथ खडसे यांना विशेष न्यायालयाचा दिलासा; जमीन खरेदी प्रकरणात जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 2:30 PM

ईडीने नोंदविलेल्या गुन्ह्यात अटक न होता जामिनावर सुटका झालेले खडसे हे महाराष्ट्रातील एकमेव माजी मंत्री आहेत.

मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात मुंबई विशेष पीएमएलए न्यायालयाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दिलासा मिळाला आहे. न्या. आर. एन. रोकडे यांनी २ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर खडसे यांचा जामीन मंजूर केला आहे. ईडीने नोंदविलेल्या गुन्ह्यात अटक न होता जामिनावर सुटका झालेले खडसे हे महाराष्ट्रातील एकमेव माजी मंत्री आहेत.भोसरी एमआयडीसीत कमी किमतीत भूखंड खरेदी केल्याच्या आरोपावरून खडसे यांना ईडीने समन्स बजावले होते तसेच त्यांच्याविरुद्ध ईसीआयआर दाखल केला. एवढेच नव्हेतर, ईडीने  एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी तसेच जावई गिरीश चौधरी व अन्य काही जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी आपल्याला नियमित जामीन मिळावा यासाठी खडसे यांनी विशेष न्यायालयात ॲड. मोहन टेकावडे यांच्यामार्फत अर्ज केला. त्यावर न्या. आर. एन. रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. 

काय आहे प्रकरण?पुणे येथील भोसरी एमआयडीसीत खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी २०१६ मध्ये अब्बास रसुलभाई उकानी या  मूळ मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना जमीन खरेदी केली. या भूखंडाची मूळ किंमत ३१ कोटी रुपये होती. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. या व्यवहारात चौधरी यांनी पाच शेल कंपन्यांकडून आलेला पैसा वापरल्याचे कागदोपत्री निष्पन्न झाले होते. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचा सुमारे ६१ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते.

ईडीच्या वतीने मात्र हा युक्तिवाद फेटाळून लावण्यात आला व जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. विशेष न्यायालयाने दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेत २ लाखांच्या जात मुचलक्यावर खडसे यांचा जामीन मंजूर केला. 

टॅग्स :एकनाथ खडसेराष्ट्रवादी काँग्रेसअंमलबजावणी संचालनालय