मुंबई : एसटी महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्यातील वेतन ७ तारखेला झाले नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये खूप नाराजी होती. मात्र बुधवारी राज्य सरकारकडून सवलतीमधील शिल्लक ३०० कोटी रुपये एसटी महामंडळाला दिले जाण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढील शनिवारी किंवा सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत दिलासा मिळेल.
दर महिन्याच्या ७ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन होते. एप्रिल महिन्यात वेतन झालेच नाही. मात्र अधिकारी वर्गाचे वेतन झाले. त्यामुळे कर्मचारी वर्गाला डावलल्याचे मत कर्मचाऱ्यांमध्ये होत होते. दरम्यान एसटी कामगार संघंटनांनी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना निवेदने पाठवून वेतन देण्याची मागणी केली आहे. वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नाही परंतु, राज्य सरकारकडे सवलतीचे शिल्लक असलेले ३०० कोटी रूपये मिळणार आहेत. मात्र हे पैसे मिळाल्यावर एक ते दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे गुरुवारी वेतन होणार नाही. शुक्रवारी गुड फ्रायडेची सार्वजनिक सुट्टी आणि शनिवार सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस काम असल्याने बँकांवर अधिकचा कामाचा ताण पडू शकतो. त्यानंतर रविवारी सुट्टी आहे. शनिवारी बँकेतील काम झाल्यास एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन शनिवारी होईल. अन्यथा, सोमवारी बँक खात्यात वेतन जमा होईल.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात 24 मार्चपासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील संपूर्ण सार्वजनिक वाहतूक बंद आहे. फक्त मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत आहेत. एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी कणा आहेत, त्यामुळे त्यांना वेतन वेळेत मिळणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया सर्व एसटी कर्मचारी संघटनाकडून येत होती.
----------------------------------------
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे कर्मचार् यांना लवकरच वेतन मिळेल.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ