नवी मुंबई : खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटरमधील कामगारांचा व्यवस्थापनाबरोबर सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. व्यवस्थापनाने बहुतांशी मागण्या मान्य केल्याने कामगारांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये २५0 कामगार काम करीत आहेत. या सर्व कामगारांना सेवेत कायम करावे, त्यांना परळ येथील टाटा हॉस्पिटलच्या धर्तीवर पगार, भत्ते आणि इतर सोयीसुविधा द्याव्यात, तसेच येथील संशोधन केंद्रातील बडतर्फ करण्यात आलेल्या २२ कामगारांना त्वरित कामावर घ्यावे आदी कामगारांच्या प्रलंबित मागण्या होत्या. त्यासाठी मागील अनेक दिवसांपासून कामगारांचा व्यवस्थापनाबरोबर लढा सुरू होता. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शनिवारी व्यवस्थापनबरोबर एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत व्यवस्थापनाकडून कामगारांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. पुढील दोन महिन्यात या सर्व मागण्यांची टप्प्याटप्प्याने पूर्तता केली जाणार आहे. दरम्यान, या बैठकीला आ.ठाकूर यांच्यासह सहाय्यक पोलिस आयुक्त सूर्यवंशी, टाटा मेमोरियल सेंटरच्या संचालिका डॉ . एस. व्ही. राधा, व्यवस्थापन अधिकारी गुप्ता, व्ही. के . सिंग, खारघरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ पाटील, प्रभाकर जोशी, वैभव पाटील आदी उपस्थित होते (प्रतिनिधी)
टाटा मेमोरियलच्या कामगारांना दिलासा
By admin | Published: May 26, 2014 5:01 AM