मुंबई : परीक्षेचा दिवस उजाडूनही हॉल तिकीट न मिळालेल्या भवन्स महाविद्यालयाच्या तब्बल १० विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून, शैक्षणिक वर्ष वाचल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.मुंबई विद्यापीठाच्या विविध विषयांच्या परीक्षा सुरू आहेत. १८ आॅक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बी.कॉमच्या परीक्षेसाठी गिरगाव येथील भवन्स महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट नसल्याने परीक्षेस बसू देण्यात आले नाही. या विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत, याची माहिती दिली. विद्यापीठाकडे या विषयी विचारणा करताच, महाविद्यालयाकडून कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा दिवस उजाडेपर्यंत हॉल तिकीट मिळाले नसल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही, असेही विद्यापीठाने सांगितले होते. बी.कॉमच्या तीन विद्यार्थ्यांसोबत भवन्सच्या बी.ए. आणि बी. एम. एस. अशा मिळून १० विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या दिरंगाईमुळे हॉल तिकीट मिळाले नव्हते. (प्रतिनिधी)
भवन्सच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना दिलासा
By admin | Published: October 24, 2016 3:14 AM