मुंबईतील २० हजार सोसायट्यांना दिलासा; अकृषक कराच्या नोटिशींना स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 07:58 AM2022-03-23T07:58:12+5:302022-03-23T07:58:25+5:30
राज्यभरातील गृहनिर्माण सोसायट्यांकडून तक्रारी आल्याने अकृषक कराच्या नोटिशींना स्थगिती देण्याची घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
मुंबई: राज्यभरातील गृहनिर्माण सोसायट्यांकडून तक्रारी आल्याने अकृषक कराच्या नोटिशींना स्थगिती देण्याची घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
मुंबईच्या उपनगरातील सुमारे २० हजार गृहनिर्माण सोसायट्यांना याचा फायदा होईल. या सोसायट्यांकडून अकृषक कर आकारण्यात येत होता. हा कर रद्द करण्यात यावा, यासाठी सर्वपक्षीय सदस्यांकडून आग्रही मागणी करण्यात आली. त्याला उत्तर देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात नियम बदलण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडून मुंबईच्या उपनगरातील अकृषक कराच्या (एनए) नोटिशींचा विषय उपस्थित केला. मुंबईच्या उपनगरात वास्तव्यास असलेल्या सुमारे ६० हजाराहून अधिक रहिवाशांना शासनाकडून अकृषक कराच्या नोटिशी बजावण्यात आल्या असून, त्या अन्यायकारक असल्याचे सभागृहात सांगितले. यावर महसूल विभागाकडून २०१८ साली यासंदर्भातील नियम तयार करून त्यानुसारच हा अकृषक कर घेतला जात असल्याचे महसूलमंत्री थोरात यांनी सांगितले.
जाचक कर रद्द करा
मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या मध्यमवर्गीयांचा हा प्रश्न आहे. अशा प्रकारे अकृषक कर लावणे हे जाचक आहे. त्यामुळे हा कर रद्द करा आणि पाठविण्यात आलेल्या कराच्या नोटिसींना स्थगिती द्या, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली. त्याचप्रमाणे रवींद्र वायकर यांनी तीन टक्के असलेला अकृषक कर .०५ टक्क्यांपर्यंत आणण्यात आला, तरीही हा कर मध्यमवर्गीयांवर अन्याय आहे.
nबांधकामावर कर वसूल करण्याऐवजी बांधकामाच्या आवारात असलेल्या मैदान, उद्यान अशा सर्व क्षेत्रफळावर हा कर वसूल करणे अन्यायकारक असल्याचे मत रवींद्र वायकर यांनी मांडले आणि हा जाचक कर रद्द करण्याची मागणी केली.