लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोरोना काळात बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या मुंबईच्या माजी महापौर व ठाकरे गटाच्या महिला नेत्या किशोरी पेडणेकर यांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम दिलासा दिला. त्यांच्यावर २८ ऑगस्टपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
कोरोना काळात बॉडी बॅग खरेदीत ४९ लाख रुपयांची अनियमितता आढळल्याने पेडणेकर, आयएएस अधिकारी पी. वेलरासू आणि उपमहापालिका आयुक्तांसह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. त्यानंतर पेडणेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने यावरील सुनावणी २८ ऑगस्टपर्यंत तहकूब करत पेडणेकर यांना तोपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा दिला.
महागड्या दरात बॉडी बॅग पुरवणाऱ्या कंपनीशी पेडणेकर यांचा कशाप्रकारे संबंध आहे, हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे सादर झालेले नाहीत, असे जामीन अर्जात म्हटले आहे. त्याशिवाय या घोटाळ्यातून पेडणेकर यांना कोणता लाभ झाला, हेसुद्धा सिद्ध करणारे पुरावे तपास यंत्रणेकडे नाहीत. विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांना लक्ष्य करणे, हे तक्रारदार किरीट सोमय्या काम आहे, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.