मुंबई :
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी जामीन अटींचे उल्लंघन केल्याने त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारा मुंबई पोलिसांचा अर्ज विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची धमकी दिल्यानंतर राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी त्यांची जामिनावर सुटका करताना न्यायालयाने राणा दाम्पत्याला अनेक अटी घातल्या होत्या. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद न साधण्याची अट न्यायालयाने राणा दाम्पत्याला घातली होती. मात्र, या अटीचे दाम्पत्याने उल्लंघन केल्याने त्यांचा जामीन अर्ज रद्द करावा, यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष न्यायालयात अर्ज केला. ‘खटल्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत नसेल, तर न्यायालयाने हस्तक्षेप करण्याचे कारण नाही, असे म्हणत विशेष न्यायालयाने जामीन रद्द करण्याचा सरकारचा अर्ज फेटाळला.