म्हाडाच्या ४ हजार ८२ घरांच्या लॉटरीतील अर्जदारांना दिलासा; पैसे भरण्यासाठी विजेत्यांना मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 10:13 AM2023-12-13T10:13:16+5:302023-12-13T10:15:58+5:30
घराचे पैसे भरण्यासाठी विजेत्यांना मिळाली मुदतवाढ.
मुंबई :म्हाडाच्या ४ हजार ८२ घरांच्या लॉटरीमधील कर्ज प्रक्रियेत विलंब झालेल्या यशस्वी अर्जदारांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. घराकरिता पहिल्या टप्प्यातील रकमेचा भरणा केलेल्या २३५ लाभार्थींना उर्वरित रक्कम भरण्यासाठी १५ दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी जाहीर केला आहे.
१४ ऑगस्ट रोजी लॉटरी काढली होती. त्यानंतर घरांचा ताबा देण्यास सुरुवात केली. दरम्यान, यशस्वी अर्जदारांनी बँकेकडून कर्ज मिळणे व या कारणांमुळे विलंब होत असल्याने सवलत द्यावी, असे निवेदन सादर केले होते. १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यशस्वी पात्र अर्जदारांना प्रथम सूचनापत्र पाठविण्यात आले आहे.
यांना विलंब का होतो आहे?
२३५ अर्जदारांनी प्रथम टप्प्यातील रकमेचा भरणा केला असून, मंडळाकडून वित्तसंस्थांकरिता कर्ज मिळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. मात्र त्यांना कर्ज मिळण्यासाठी विलंब होत आहे.
डिजिटल स्वाक्षरी :
सर्व प्रक्रियेत सर्व पात्र अर्जदारांना अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जात आहेत. यामुळे बनावट, खोटी कागदपत्र बनविणाऱ्यांना चाप बसणार आहे.
१६०० लाभार्थींनी किमतीचा १०० टक्के भरणा केला. ७५० अर्जदारांना ताबापत्र देण्यात आले आहे.
कुठे आहेत घरे?
अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन
क्यूआर कोड :
सर्व पत्रांवर क्यूआर कोड टाकण्यात आला असून, क्यूआर कोडद्वारे या कागदपत्रांची सत्यता तपासता येणार आहे.
यांना कधी भेटायचं?
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल हे सोमवारी आणि गुरुवारी नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी वेळ राखीव ठेवत आहेत.
यांना घराचा ताबा का नाही?
काही अर्जदारांनी रक्कम पूर्ण भरलेली होती. त्यांना घराचा ताबा घेण्यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, कलाकार असल्याचे प्रमाणपत्र सादर करणार या अटीने अर्ज केले होते. ते कागदपत्र सादर करू शकलेले नाहीत.
फसवणूक होणार नाही :
कागदपत्रांची दुय्यम अथवा बनावट प्रत तयार करून नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार टाळता येणार आहेत.