मुंबई - खाद्यतेलाचे दर पुन्हा एकदा घसरले आहेत. ग्राहकांना कमी किमतीत तेल मिळत असल्याने किचनमध्ये रोज तेलाचे नवनवे पदार्थ बनवले जात आहेत. पुरी, कचोरी, समोसे, पापड, वडे, भजी असे चमचमीत पदार्थ घरीच बनवले जात आहेत. असे असले तरी सध्याचा वाढता उकाडा पाहता तेल जरा जपूनच खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
तेलाचे दर काही दिवसांपूर्वी बऱ्यापैकी कमी झाले आहे. दर घटल्याने त्याची मागणीही बऱ्यापैकी वाढली आहे. परदेशातून येणाऱ्या तेलबियांची आवक जास्त असल्याने तेल स्वस्त झाले आहे. मुंबईतील वेगवेगळ्या विभागानुसार या तेलाच्या किमतीत फरक आढळतो. सणावाराचे दिवस नसल्यानेही तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत.
यंदा परदेशातून येणाऱ्या तेलबियांचे प्रमाण वाढल्याने त्याचा परिणाम तेलाच्या किमतीवर झाला. तेलाचे दर कमी झाले आहेत. हे दर पावसाळा सुरू होईपर्यंत स्थिर राहतील, अशी शक्यता आहे. - प्रमोद कुमावत, व्यापारी
तेलातील ट्रान्स फॅट हा घटक शरीरासाठी घातक मानला जातो. ते पोटात गेल्याने चांगले कोलेस्टेरॉल कमी होऊन वाईट कोलेस्टेरॉल वाढू लागते. वापरलेल्या स्वयंपाकाचे तेल अल्डेहाईडसारखे अनेक विष बाहेर टाकते, जे हृदयाला हानिकारक असते.