Join us

‘नायर’मधील चौकशी कक्षाचा रुग्णांना दिलासा

By admin | Published: November 07, 2015 3:51 AM

‘अहो ओपीडी १४ कुठे आहे?’, ‘एक्सरेसाठी कुठे जायचे?’, ‘केसपेपर कुठे काढायचा?’, ‘रक्त तपासणी कुठे करायची?’ असे प्रश्न रुग्णालयात गेल्यावर रुग्णांच्या नातेवाइकांना पडतात.

मुंबई: ‘अहो ओपीडी १४ कुठे आहे?’, ‘एक्सरेसाठी कुठे जायचे?’, ‘केसपेपर कुठे काढायचा?’, ‘रक्त तपासणी कुठे करायची?’ असे प्रश्न रुग्णालयात गेल्यावर रुग्णांच्या नातेवाइकांना पडतात. अनेकदा योग्य ती माहिती न मिळाल्याने फिरण्यातच वेळ जातो. असे प्रकार टाळण्यासाठी नायर रुग्णालयाने बाह्यरुग्ण विभाग इमारतीच्या बाहेरच चौकशी कक्ष सुरू केला आहे. महापालिकेच्या नायर, केईएम आणि सायन या प्रमुख रुग्णालयांत सर्व प्रकारचे उपचार होत असल्याने या रुग्णालयांमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त असते. नायर रुग्णालयात चार इमारती आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच आलेले किंवा इतर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक भांबावून जातात. नक्की कुठे जायचे, हे अनेकांना समजत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी बाह्यरुग्ण विभाग इमारतीबाहेरच चौकशी कक्ष सुरू केला आहे. बाह्यरुग्ण विभाग इमारतीतील या चौकशी कक्षात सकाळी ९ वाजल्यापासून एक कर्मचारी नेमला जातो. त्यामुळे अनेक रुग्णांना आता दिलासा मिळाला आहे. तपासणी, केसपेपर यासाठी ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या नेमक्या विभागाचा ठावठिकाणा आता रुग्णांना लगेच कळतो. काही महिन्यांपूर्वीच महापालिकेने रुग्णांच्या मदतीसाठी चौकशी कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. नायर रुग्णालयात याची अंमलबजावणी केली आहे. (प्रतिनिधी)