बलात्कारप्रकरणी धर्मगुरूला अटक, शिक्षिकेनं केली होती तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 07:34 AM2021-06-28T07:34:51+5:302021-06-28T07:35:03+5:30
न्यायालयीन काेठडी; शिक्षिकेच्या तक्रारीनुसार देवनार पाेलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिक्षिकेवर बलात्कार केल्याच्या आरोपाअंतर्गत गोवंडीतील ख्रिश्चन धर्मगुरू प्रशांत जाधवला देवनार पोलिसांनी अटक केली. शारीरिक संबंधास नकार दिला म्हणून त्याने शिक्षिकेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली हाेती. शिवाय कॉल गर्ल म्हणून तिचा मोबाइल क्रमांकही सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप या शिक्षक महिलेने केला आहे.
तक्रारदार घटस्फाेटित शिक्षिका सध्या आपल्या मुलांसोबत बंगळूरूमध्ये राहण्यास आहेत. त्यांनी केलेल्या आरोपानुसार, मुंबईत असताना २०१२ मध्ये बहिणीच्या लग्नात त्यांची प्रशांत जाधवशी ओळख झाली. पुढे याच ओळखीतून जाधवने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दोघांत संवाद वाढला. त्यांच्यात मैत्री झाली. २१ सप्टेंबर २०१४ रोजी जाधवने देवाच्या सांगण्यावरून पत्नी म्हणून स्वीकार करत असल्याचे सांगून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
पुढे ५ ते ६ वर्षे त्यांच्यात प्रेमसंबंध होते. २०१७ मध्ये त्यांनी जाधवला पत्नीस घटस्फोट देवून सोबत राहण्यास सांगितले. मात्र जाधवने देवाने पत्नी म्हणून नाकारण्यास सांगितल्याचे सांगून पत्नीस घटस्फाेट देण्यास नकार दिला. पुढे, शिक्षिकेचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
२०२० मध्ये तिच्या धनादेशाद्वारे पैसे काढण्याचा प्रयत्न केला. धनादेश न वठल्याने तिला मारहाण केली. शिवाय व्हिडीओ व्हायरल करण्याच्या नावाखाली तिचे दागिनेही बळकावले. त्यानंतर बनावट फेसबुक अकाऊंटवर काॅल गर्ल म्हणून महिलेचा क्रमांक शेअर केला, असे शिक्षिकेने तक्रारीत नमूद केले आहे. जाधवच्या अत्याचाराला कंटाळून त्यांनी मुंबई सोडण्याचे ठरवले. मात्र त्यापूर्वी देवनार पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
त्यानुसार पोलिसांनी बलात्कार, मारहाण, शिविगाळ प्रकरणी १३ मे रोजी गुन्हा नोंदवला. नुकतेच या गुन्ह्यात जाधवला अटक करण्यात आली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी देवनार पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याच्या अटकेच्या वृत्ताला देवनार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सावळाराम आगवणे यांनी दुजोरा दिला.