बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज कालवश; मुंबईत घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 10:07 AM2020-10-31T10:07:23+5:302020-10-31T13:14:56+5:30
Sant Ramrao Maharaj News: बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामरावबापू महाराज यांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून अस्थिर होती. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.
दिग्रस/मानोरा : संत सेवालाल महाराजांचे वंशज तथा बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांचे मुंबई येथे ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास निधन झाले.
बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामरावबापू महाराज यांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून अस्थिर होती. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. काही महिन्यांपूर्वी श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथे लिलावती रुग्णालयात उपचारही करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी ते मुंबई येथे गेले होते. त्यात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवार, ३० आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी त्यांच्यासोबत महंत शेखर महाराज होते. डॉ. रामराव महाराज हे १९४८ मध्ये पोहरादेवी संत सेवालाल महाराज संस्थानच्या गादीवर बसले होते.
सोमवारी पोहरादेवीत होणार अंत्यसंस्कार
बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री ११ वाजता जगाचा निरोप घेतला. रामराव महाराज यांच्याविषयाी बंजारा समाजात अपार श्रद्धा असून, त्यांच्या पार्थिवावर सोमवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात आले.