चैत्यभूमीवर 'दलित पँथर' लढ्याच्या आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 09:58 PM2024-05-30T21:58:28+5:302024-05-30T22:01:01+5:30
Mumbai News: दलित पँथर संघटनेच्या वर्धापन दिन सोहळानिमित्त बुधवारी चैत्यभूमीवर अशोकस्तंभ जवळ 'दलित युथ पँथर' संघटनेने जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यात पँथरच्या लढाऊ कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 'पँथर पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
- श्रीकांत जाधव
मुंबई - दलित पँथर संघटनेच्या वर्धापन दिन सोहळानिमित्त बुधवारी चैत्यभूमीवर अशोकस्तंभ जवळ 'दलित युथ पँथर' संघटनेने जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यात पँथरच्या लढाऊ कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 'पँथर पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा दलित पँथर लढ्याच्या कटू आणि सोनेरी आठवणींना जुन्या पँथर कार्यकर्त्यांनी उजाळा दिला.
बुधवारी २९ मे रोजी चैत्यभूमी येथे दलित पँथरचा ४४ वा वर्धापण दिनानिमित्त 'दलित युथ पँथर' चे अध्यक्ष निलेश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा संपन्न झाली. सभेचे सूत्रसंचालन धम्मु आगरकर यांनी केले. तसेच दलित पँथर चे सहसंस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक ज. व्ही पवार, रिपब्लिक नेते अर्जुन डांगळे, पँथर नेते सुरेश केदारे यांनी मार्गदर्शक केले. प्रमुख पाहुणे म्हणून सुमेध जाधव, दिपक पवार, बबन सरवदे उपस्थित होते.
तर विठ्ठल उमप थेटर प्रस्तुत शाहीर संदेश उमप, शाहीर चंद्रकांत शिंदे,आश्विन निभावणे, विनोद विद्याधर यांनी बुद्ध,भीम, पँथर गीतांचा सुरेख कार्यक्रम सादर केला. विद्यार्थि नेते राहुल सोनपिंपळे यांना ह्या वर्षीचा पँथर पुरस्कार प्रधान करण्यात आला. यानिमित्त रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचें वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आंबेकरी कार्यकर्ते उपस्थित होते.
- सत्तरचा दशकात दलितांवरील जातीय हल्ले आणि जातपातीच्या रागाने घरे जाळण्याच्या घटनांनी कळस गाठला होता. दलिताना गावात जगणे अशक्य झाले होते. त्याच वेळी महाराष्ट्रातील शिक्षित तरुणांनी दलित पँथर नावाने आक्रमक संघटना सुरू करत जातीय हल्ले करणाऱ्या विरोध बंड केले. या बंडामुळे दलितांवरील होणारे हल्ले थांबले आणि दलित पँथर चळवळीचा सर्वत्र दबदबा निर्माण झाला.