लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वरळी येथील सासमिरा मार्गालगत १ मनपा दवाखाना व १ मनपा आरोग्य केंद्र आहे. दवाखाना व आरोग्य केंद्र असलेली ही इमारत ३० वर्षे जुनी आहे. संरचनात्मक परीक्षणादरम्यान इमारतीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यामुळे इमारतीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी इमारतीतील दवाखाना व आरोग्य केंद्र साधारणपणे ६ महिन्यांच्या कालावधीसाठी स्थलांतरित करण्यात येत आहे.
सासमिरा मार्ग मनपा दवाखाना हा वरळी लेबर कॅम्पमधील मनपा शाळेत, तर आरोग्य केंद्र हे वरळी बी. डी. डी. चाळ क्रमांक १२१ च्या समोरील ऑरस चेंबरमध्ये स्थलांतरित करण्यात येत असल्याचे महापालिकेने सांगितले. दवाखाना व आरोग्य केंद्राच्या इमारतीचे दुरुस्ती काम हे संरचनात्मक परीक्षण अहवालानुसार महापालिकेच्या आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाद्वारे करण्यात येईल. यासाठी निविदा प्रक्रियेअंती कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच इमारतीच्या प्रत्यक्ष दुरुस्ती कामाला सुरुवात हाेईल.
महापालिका क्षेत्रात १८६ दवाखाने असून २११ आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. यापैकीच १ दवाखाना व १ आरोग्य केंद्र हे वरळी परिसरातील ॲनी बेझंट मार्गाजवळ व वरळी बेस्ट डेपोजवळील सासमिरा मार्गालगत आहे. वरळी परिसरातील पोलीस कॅम्प, शिवाजीनगर, सासमिरा परिसर इत्यादी भागातील सुमारे ६६ हजार लोकसंख्येला या दवाखान्याचा व आरोग्य केंद्राचा लाभ होतो.
......................................................