आजारातून उठलेल्या श्वानांना नेण्यास मालकांची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2023 01:08 PM2023-04-08T13:08:30+5:302023-04-08T13:08:48+5:30
नवजात श्वानांचा मृत्युदर अधिक, विषाणूचा प्रादुर्भाव वाढतोय
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत कोरोना विषाणूंमधील जनुकीय बदलांमुळे पुन्हा संसर्ग वाढत आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे एरवी मार्च महिन्यात कमी आढळून येणारा श्वानांमधील कॅनाइन डिस्टेंपर विषाणू दिवसेंदिवस वाढत असल्याचे चिंताजनक निरीक्षण परळ येथील बैलघोडा रुग्णालयातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. या विषाणूचा संसर्ग झालेले दर महिन्याला ८० ते १०० श्वान रुग्णालयात दाखल होत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, आजारातून बरे झालेल्या श्वानांना पुन्हा घरी नेण्यास मालक टाळाटाळ करत असल्याने त्यांच्या वाट्याला पोरकेपणा येत आहे.
पशुवैद्यकीय रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. मयूर डंगर यांनी सांगितले की, एरवी मार्च महिन्यात या विषाणूचा संसर्ग कमी प्रमाणात असतो. यंदा मात्र हे चित्र विरोधाभासी आहे. सध्या या विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दिवसाला रुग्णालयात सुमारे सात श्वान दाखल होत आहेत. सध्या एकूण १२ श्वान उपचाराधीन आहेत. या विषाणूचा संसर्ग होणाऱ्या एकूण श्वानांपैकी ५० टक्के श्वानांचा मृत्यू ओढावत आहे. आजारातून बरे होऊनही आयुष्यभराची व्यंगता येत असल्याने श्वानांना रुग्णालयातून नेणे टाळले जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या विषाणूचा संसर्ग झालेल्या एकूण श्वानांपैकी १० टक्के श्वानांना रुग्णालयात दाखल करून मालक घेऊन जात नसल्याचे दिसून येत आहे, हे निराशाजनक आहे. यापूर्वी, रुग्णालयात डिस्टेंपर विषाणूवर उपचार करण्यासाठी खाटांची क्षमता वाढविण्यात आली असून, सध्या २० खाटा आहे. पुढील काळात गरज भासल्यास याचा विस्तार करण्यात येईल. लसीकरण न झालेल्या श्वानांमध्ये आजार त्वरित वाढत असल्याचे दिसून येत आहे.
श्वानांमधील कॅनाइन डिस्टेंपर विषाणू ढत आहे. असे निरीक्षण परळच्या बैलघोडा रुग्णालयातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. महिन्याला ८० ते ९० श्वान रुग्णालयात दाखल होत आहेत.
संसर्गाची भीती अधिक
- नवजात श्वानांमध्ये रोगप्रतिकारशक्तीचा अभाव असतो. परिणामी, त्यांना कुठलाही संसर्ग त्वरित होतो.
- त्यामुळे संसर्ग होऊन त्याची तीव्रता वाढल्याने नवजात श्वानांमध्ये मृत्यू अधिक होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
यामुळे वाढतोय विषाणूचा प्रादुर्भाव
- अनेकदा श्वानांना प्रतिजैविके देण्यात येतात.
- या प्रतिजैविकांची मात्रा किती असावी, कोणत्या कारणासाठी द्यावीत, याविषयी समाजात माहिती व जनजागृतीचा अभाव आहे.
- त्यामुळे या विषाणूची लागण झाल्यावर श्वानांवर अन्य औषधांचा परिणाम होत नाही.
- परिणामी संसर्ग झपाट्याने वाढतो.
- याखेरीस वातावरणीय बदल, विषाणूतील जनुकीय बदलही संसर्गाच्या गतीला कारणीभूत आहेत, अशी माहिती डॉ. डंगर यांनी दिली.