Join us

अमेरिकेतून रेमडेसिविर मुंबईत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देशात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देशात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने या औषधांची आयात वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी अमेरिकेहून मुंबई विमानतळावर रेमडेसिविरचा साठा दाखल झाला.

अमेरिकेतील गिलियड सायन्सेसकडून ही रेमडेसिवीर इंजेक्शन आयात करण्यात आली. मेसर्स क्लिनेरा ग्लोबल सर्व्हिसेस आणि अमिरात एअरलाइन्सच्या इ. के. ५०० या विमानाच्या मदतीने औषधांचा साठा मुंबईत आणला. त्यात रेमडेसिविरच्या २९ हजार ५१४ कुप्यांचा समावेश आहे. पहाटे ३.१५ मिनिटांनी दाखल झालेल्या या औषध साठ्याला १० मिनिटांच्या आत जकात मंजुरी दिल्याची माहिती सीमा शुल्क विभागाने दिली.

सध्या परदेशातून कोविडसंबंधीत मदतीचा ओघ वाढला आहे. या अत्यावश्यक साहित्याला जलदगतीने परवानगी देण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परदेशातून येणाऱ्या कोविडसंबंधीत ९५ टक्के सामग्रीची हाताळणी ओळखरहित मूल्यांकन प्रणालीद्वारे केली जाते, असेही सांगण्यात आले. दरम्यान, अमेरिकेतून मुंबई विमानतळावर दाखल झालेली रेमडेसिविर विविध राज्यांना त्यांच्या कोट्यानुसार देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली.

.............................................