मुंबई - पावसाने मागील काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा हजेरी लावली आहे. यामुळे अनेक विभागांमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. आतापर्यंत मुंबईत अशा ७७५ खड्ड्यांची नोंद झाली आहे. यापैकी ४८४ खड्डे पालिकेने बुजवले आहेत. २९१ झाडांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दशकांत मुंबईतील रस्त्यांवर तब्बल २१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दुरुस्ती, देखभाल आणि नवीन रस्ते बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही खड्डेमुक्त मुंबई हे दिवास्वप्नच ठरले आहे. पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टीममुळे मुंबईतील खड्ड्यांची दररोज नोंद होत आहे.
शुक्रवारपर्यंत ७७९ खड्ड्यांच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यापैकी ४८४ खड्डे बुजविल्यात आले असून ४३ खड्डे अन्य प्राधिकरणांच्या रस्त्यांवरील आहेत. पालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या केवळ २९१ खड्डे शिल्लक आहेत. प्रत्यक्षात घाटकोपर-मुलुंड रोड, अंधेरी, चेंबूर, सांताक्रूझ पूर्व अशा ठिकाणी खड्डे दिसून येतात.