उर्वरित ८० कृषी अधिकारी, उपसंचालक आंदोलनावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 08:39 PM2024-03-03T20:39:32+5:302024-03-03T20:39:40+5:30
नियुक्ती दिल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नसल्याचा निर्धार
श्रीकांत जाधव / मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य कृषी सेवा परीक्षेत पात्र उमेदवारांची शिफारस आयोगाने शासनाकडे केली आहे. मात्र, नियुक्ती न दिल्याने अधिवेशन काळात उमेदवारांनी आझाद मैदानात बेमुदत आंदोलन केले. त्याची दखल घेत शासनाने केवळ १२१ कृषी अधिकार्यांना नियुक्ती दिली. उर्वरित ६१ तालुका कृषी अधिकारी आणि १९ उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना विनाविलंब नियुक्त्या देण्यात याव्या, या मागणीसाठी ८० अधिकारी अजूनही आंदोलन करीत आहेत.
कृषि अधिकारी नियुक्तीसाठी रखडलेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश तात्काळ द्यावेत, अशी जोरदार मागणी विधानसभेत विरोधीपक्षाने केली होती. यावर राज्य सरकारकडून दखल घेत पात्र २०३ उमेदवारांपैकी केवळ १२१ कृषी अधिकार्यांना नियुक्ती दिली. त्यामुळे इतर उमेदवारांमध्ये निराशा आणि संतापाचे वातावरण आहे.
हे सर्व उमेदवार मागील ७ महिन्यापासून नियुक्ती न दिल्याने आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. यासर्व उमेदवारांची कागदपत्रे १७ व १८ ऑगस्ट, २०२३ रोजी तपासून पूर्ण झालेली आहेत. तरीही मागील ७ महिन्यापासून यांच्या नियुक्तीची प्रक्रिया कृषी विभागाकडून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे उर्वरित ८० उमेदवार आजही आपल्या आंदोलनावर ठाम असून त्यांनी आपले आंदोलन आझाद मैदानात सुरू ठेवले आहे.