मुंबई : शीना बोरा हत्याकांडाच्या तपासातील गुंतागुंत कायम असताना आता त्यामध्ये पोलिसांच्या तपासात आणखी एक अडचण निर्माण झालेली आहे. पेण पोलिसांकडून मिळालेल्या मानवी सांगाड्याचे अवशेष शीनाचे नसल्याचे फॉरेन्सिक लॅबच्या चाचणीतून स्पष्ट झाले आहे. तपासणीसाठी पाठविलेले अवशेष शीनाशी जुळत नसल्याचा अहवाल नायर रुग्णालयाने नुकताच खार पोलिसांना सादर केला. त्यामुळे पोलिसांनी सादर केलेले हाडाचे सांगाडे कोणाचे, हा नवा प्रश्न निर्माण झालेला आहे.जळलेल्या अवस्थेत मिळालेला मृतदेहाचा सांगाडा सापडूनही गुन्हा दाखल न केल्याने रायगड पोलीस आधीच वादाच्या भोवऱ्यात आहेत. त्यातच त्यांनी मिळविलेले अवशेष शीनाचे नसल्याने त्याचा तपासावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.२४ एप्रिल २०१२ रोजी इंद्राणी मुखर्जी हिने तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि कारचालक श्यामवर रॉयच्या मदतीने शीनाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रायगड पेण येथील गागोदे खिंड येथे एका बॅगेत शीनाचा मृतदेह फेकून तो पेट्रोलने जाळून टाकला. त्यानंतर २३ मे २०१२ रोजी जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह पेण पोलिसांना सापडला. त्यांनी हे अवशेष जेजे रुग्णालयात पाठविले. जेजे रुग्णालयाने एका अहवालासह ते अवशेष फॉरेन्सिक चाचणीसाठी नायर रुग्णालयाकडे पाठविले. पोलिसांनी शीना बोरा हत्याकांडाचा उलगडा करून इंद्राणीसह, खन्ना आणि चालक रायला अटक केली. अटकेनंतर शीनाच्या पुरलेला मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढण्यात आला. त्या सांगाड्यातील अहवालातील डीएनए इंद्राणी, मिखाईलच्या डीएनएशी जुळले. मात्र त्याचवेळी रायगड पोलिसांनी पाठवलेल्या अवशेषांच्या अहवालांचे डीएनए मात्र जुळत नसल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे पेण पोलिसांनी दिलेल्या हाडांचे अवशेष नेमके कुणाचे, असा प्रश्न येथे निर्माण झाला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
हाडांचे अवशेष शीनाचे नाहीत!
By admin | Published: September 22, 2015 2:12 AM