कोरोना लढ्यात बोरिवलीत उल्लेखनीय कार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 11:19 AM2020-07-14T11:19:16+5:302020-07-14T11:20:15+5:30
पोलीस निरीक्षक माडये यांचा सत्कार; पोलीस आयुक्तांनी दिले निर्देश
मुंबई: बृहन्मुंबई पोलीस दलातील ज्या आठ अधिकाऱ्यांनी covid-19 च्या कालावधीमध्ये उल्लेखनीय कामकाज केले आहे, त्यांचा शुक्रवारी खासगी बँकेकडून सत्कार करण्यात आला. यामध्ये बोरिवली पोलीस ठाण्याचे अधिकारी विजय माडये यांचाही समावेश असुन पोलीस आयुक्तांनी स्वतः याचे निर्देश दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कोरोना लढ्यात शहीद झालेल्या १२ अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येकी ५० हजारांची मदत माडये यांनी मिळवून दिली होती. त्यासाठी त्यांनी बरीच धावपळ केली. तसेच लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यात लहान मुले, वृद्ध व्यक्ती तसेच अपंग व अंध व्यक्तींचाही समावेश होता. त्यांच्यासाठी विविध संस्था आणि कंपन्यांशी संपर्क करत त्यांना तयार जेवणापासून धान्य, पिण्याचे पाणी असेच अनेक आवश्यक गोष्टी त्यांनी पुरविल्या. याच बरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली पोलीस ठाण्यातील सहकाऱ्यांचे मनोबल वेळोवेळी उंचावत कायदा व सुव्यवस्था राखण्यात ते यशस्वी झाले. या सगळ्या गोष्टींसाठी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांचे कौतुक केलेच पण अशा अधिकारी व कर्मचाऱ्याचा सत्कार व्हावा या उद्देशाने त्यांच्या
नावाची यादी काही बँका- संस्था यांना दिली. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी खासगी बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात येऊन माडये यांचा ट्रॉफी, शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला आहे. बोरिवली पोलीस ठाण्यातील अन्य सहकाऱ्यांना देखील यामुळे सकारात्मक संदेश मिळून त्यांच्यातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
......................
मालवणच्या ईजग्याचे गाववाल्यांका कौतुक...
माडये हे मालवणच्या काळसे गावचे असुन मेहनतीने पोलीस खात्यात नोकरी मिळवणाऱ्या आपल्या या लाडक्या 'ईजग्या' चा प्रवास गावकऱ्यांनी पाहिला आहे. त्यामुळे कोरोनाशी लढा देताना त्यांचा झालेला गौरव पाहुन गावावाल्याना देखील त्याचे फार कौतुक वाटले.