मुंबई - भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला होता. या साठ्याचे वाटप झाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ चित्रफितीद्वारे ही माहिती दिली. राजकारण अथवा श्रेयासाठी नव्हे तर, गरीब जनतेचे प्राण वाचविण्यासाठी हे पाऊल उचलले. मात्र, सरकार कारवाई करेल म्हणून गोपनीयता बाळगली, असे त्यांनी व्हिडिओत म्हटले होते. त्यानंतर, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विखेंचं कृत्य योग्य नसून ते साहित्य आरोग्य विभागाकडे जमा करायला हवे, अशा शब्दात खडसावले. त्यानंतर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सुजय विखेंचे कान टोचले आहेत.
खासदार विखे यांनी विशेष विमानाने इंजेक्शनचा साठा शिर्डीत उतरविला व तो वाटपही केला. त्यातील प्रत्येकी शंभर इंजेक्शन त्यांनी शिर्डीचे साईबाबा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाला मोफत दिल्याचं त्यांनी म्हटलं. विखेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकीकडे रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना, सुजय विखेंना हे इंजेक्शन मिळालेच कसे?, असा सवाल अनेकांनी फेसबुकवर विचारला. तर, यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल झाली होती. त्यावर, सुनावणी करताना न्यायालयाने सुजय विखेंना फटकारले. त्यानंतर, अजित पवार यांनीही शरद पवारांचा दाखला देत सुजय विखेंना सुनावले.
सुजय विखे पाटील यांनी परदेशातून आणलेली औषधे किंवा इंजेक्शने सरकारकडे जमा करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. तुम्ही जरी लोकप्रतिनीधी असला तरी, तुम्ही जे साहित्य आणलंय ते कोणत्या कंपनींच आहे, त्याची तपासणी झालीय का, त्याला मान्यता आहे का, या सगळ्या गोष्टी तपासून दिल्या जातात. आता, मधल्या काळात शरद पवार यांनाही ओळखीमुळे काहींनी दिल्या, त्यावेळी पुण्याचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना द्या, साताऱ्याचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना द्या, मुंबईला द्यायचंय तर आयुक्तांना द्या, असे आदेश पवारसाहेबांनी दिले होते, असं उदाहरण अजित पवार यांनी दिलं.
यांच्या विमानातील व्हिडिओचा आणि फोटोंचा कोणी अतिरेक करु नये, पण लोकप्रतिनिधींनी सगळ्या गोष्टींची शहानिशा करुनच आपलं काम केलं पाहिजे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले. उदाहरण सुजय विखेंचं असले तरी सर्वच पक्षातील लोकप्रतिनीधींनी या महामारीच्या संकटात सामंजस्य भूमिका घ्यायला हवी, असेही पवार म्हणाले.
रुपाली चाकणकरांनी उपस्थित केले होते सवाल
''खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून १० हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे. एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्समध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिव्हीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी.'', असे अनेक सवाल चाकणकर यांनी विचारले आहेत.