काेराेना रुग्णांना दिलासा; ‘रेमडेसिवीर’ येणार नियंत्रणात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 02:26 AM2021-03-12T02:26:23+5:302021-03-12T02:27:24+5:30
काेराेना रुग्णांना दिलासा; अन्न व औषध प्रशासनाच्या वेगाने हालचाली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेराेना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ हाेत आहे. या रुग्णांवरील उपचारासाठी रेमडीसिवीर इंजेक्शन प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. फेब्रुवारी, २०२१पासून रुग्णालये व रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना या औषधाची विक्री किंमत कमी केली; परंतु छापील विक्री किंमत कमी केलेली नाही. त्यामुळे रुग्णांना छापील विक्री किमतीनुसार आकारणी होत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे रेमडीसिवीर इंजेक्शनच्या किमती नियंत्रित करून १५०० रुपयांपर्यंत कमी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी याप्रकरणी कार्यवाही करण्याच्या दिलेल्या सूचनेनुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता रेमडीसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी सदर औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना सरासरी १,०४० रुपये किमतीत केल्याचे आढळून आले.
रेमडीसिवीर इंजेक्शनबाबत रुग्णालयांनी काराेनाबाधित रुग्णांना आकारलेल्या किमतीबाबत पडताळणी केली असता काही रुग्णालये त्यांच्या खरेदी किमतीवर १० ते ३० टक्के एवढी अधिक रक्कम रुग्णांकडून आकारत असल्याचे निदर्शनास आले. बहुतांश रुग्णालये खरेदी किंमत कमी असूनही छापील किंमत आकारून मोठ्या प्रमाणावर नफा कमावत असल्याचे व यामुळे रुग्णांना जास्त पैसे माेजावे लागत असल्याचेही समाेर आले.
याबाबत अन्न व औषध प्रशासन आयुक्तांनी याबाबत दखल घेऊन रेमडीसिवीर इंजेक्शनची उत्पादकांची विक्री किंमत व प्रत्यक्षात रुग्णांना आकारण्यात येणारी किंमत यामधील तफावत कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली.
छापील किंमत निश्चित करण्याचे निर्देश
अन्न व औषध प्रशासनाने रेमडीसिवीर इंजेक्शनच्या सर्व उत्पादकांना सदर औषधाच्या किमती त्यांच्या विक्री किमतीच्या जास्तीत जास्त ३० टक्के जास्त आकारून छापील किंमत निश्चित करण्याचे निर्देश दिले असून, लवकरच रेमडीसिवीर इंजेक्शनच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.