हॉटेलच्या फ्रीजमध्ये लपवले रेमडेसिविर इंजेक्शन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:06 AM2021-04-28T04:06:30+5:302021-04-28T04:06:30+5:30

महिलेसह पाच जणांना अटक; १८ ते २० हजार रुपयांना विक्री, इंस्ट्राग्रामवरील पोस्टमुळे उघड झाला काळाबाजार लोकमत न्यूज नेटवर्क ...

Remedicivir injections hidden in the hotel fridge | हॉटेलच्या फ्रीजमध्ये लपवले रेमडेसिविर इंजेक्शन्स

हॉटेलच्या फ्रीजमध्ये लपवले रेमडेसिविर इंजेक्शन्स

Next

महिलेसह पाच जणांना अटक; १८ ते २० हजार रुपयांना विक्री, इंस्ट्राग्रामवरील पोस्टमुळे उघड झाला काळाबाजार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोरेगाव, अंधेरी साकीनाका परिसरात कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या एका महिलेसह ५ जणांना अटक करून एकूण ३२ रेमडेसिविर इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. आरोपीने ती हॉटेलच्या किचनमधील फ्रीजमध्ये लपवून ठेवली होती.

स्नेहा शहा, रोहित कांबळे, अथर्व चिंतामणी, शुभम बक्षी, दीपक खडका अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दुसरीकडे काेराेनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची साठेबाजी, काळाबाजार केला जात आहे. रुग्णांचे नातेवाईक या इंजेक्शनसाठी वणवण भटकत आहेत. अशातच शुभमने त्याच्या इंस्टाग्रामवर २० हजार रुपयात रेमडेसिविर उपलब्ध असल्याची माहिती शेअर केली. ही पोस्ट गुन्हे शाखेच्या कक्ष १२ च्या नजरेत पडताच कक्ष १२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पाठपुरावा सुरू केला.

डमी ग्राहकाद्वारे शुभमसोबत संपर्क साधून रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी केली. ठरल्याप्रमाणे तडजाेडीअंती १८ हजार रुपयांत इंजेक्शन देण्यास ताे तयार हाेताच पथकाने सापळा रचला. २३ एप्रिल रोजी शुभमसह स्नेहाही तेथे इंजेक्शन घेऊन आली. शुभमने तो स्नेहाकडून इंजेक्शन घेत असल्याचे सांगितले. त्यानुसार दोघांकडून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आले.

पुढे, स्नेहाकडे केलेल्या चौकशीत तिने ते इंजेक्शन असल्फामध्ये हॉटेल असलेल्या कांबळेकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकला. तेथील फ्रीजमधून २४ रेमडेसिविर इंजेक्शन्स जप्त करण्यात आली. त्यापाठोपाठ खडका आणि चिंतामणीही पथकाच्या हाती लागले. आरोपींच्या झाडाझडतीत आणखी इंजेक्शन्स जप्त करण्यात आली.

* ३४ रेमडेसिविर जप्त

गुन्हे शाखेने मंगळवारपर्यंत एकूण ३२ ते ३४ रेमडेसिविर जप्त केली आहेत. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, याचा पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.

* इंजेक्शनचे गुजरात कनेक्शन

आरोपींच्या चौकशीत गुजरातमधील प्रकाश नावाच्या व्यक्तीकडून रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करण्यात येत होते. त्यानंतर ते मुंबईत प्रत्येकी २० हजार रुपयांना विकण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.

..........................

Web Title: Remedicivir injections hidden in the hotel fridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.