Join us

हॉटेलच्या फ्रीजमध्ये लपवले रेमडेसिविर; इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे गुन्हा उघड, पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 6:29 AM

\इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे गुन्हा उघड, पाच जणांना अटक

मुंबई : गोरेगाव, अंधेरी साकीनाका परिसरात कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या एका महिलेसह ५ जणांना अटक करून एकूण ३२ रेमडेसिविर इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. आरोपीने ती हॉटेलच्या किचनमधील फ्रीजमध्ये लपवून ठेवली होती.

स्नेहा शहा, रोहित कांबळे, अथर्व चिंतामणी, शुभम बक्षी, दीपक खडका अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दुसरीकडे काेराेनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची साठेबाजी, काळाबाजार केला जात आहे. रुग्णांचे नातेवाईक या इंजेक्शनसाठी वणवण भटकत आहेत. अशातच शुभमने त्याच्या इन्स्टाग्रामवर २० हजार रुपयांत रेमडेसिविर उपलब्ध असल्याची माहिती शेअर केली. ही पोस्ट गुन्हे शाखेच्या कक्ष १२ च्या नजरेत पडताच कक्ष १२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पाठपुरावा सुरू केला.

डमी ग्राहकाद्वारे शुभमसोबत संपर्क साधून रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी केली. ठरल्याप्रमाणे तडजाेडीअंती १८ हजार रुपयांत इंजेक्शन देण्यास ताे तयार हाेताच पथकाने सापळा रचला. २३ एप्रिल रोजी शुभमसह स्नेहाही तेथे इंजेक्शन घेऊन आली. शुभमने तो स्नेहाकडून इंजेक्शन घेत असल्याचे सांगितले. त्यानुसार दोघांकडून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आले.

पुढे, स्नेहाकडे केलेल्या चौकशीत तिने ते इंजेक्शन असल्फामध्ये हॉटेल असलेल्या कांबळेकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकला. तेथील फ्रीजमधून २४ रेमडेसिविर इंजेक्शन्स जप्त केली. त्यापाठोपाठ खडका आणि चिंतामणीही पथकाच्या हाती लागले. आरोपींच्या झाडाझडतीत आणखी इंजेक्शन्स जप्त करण्यात आली.

टॅग्स :रेमडेसिवीरमुंबई