सुधाकर नाडकर्णी यांच्या आठवणींना उजाळा
By admin | Published: June 13, 2017 02:42 AM2017-06-13T02:42:37+5:302017-06-13T02:42:37+5:30
भारतात अभिकल्प (डिझाइन) आणि अभिकल्प विचारधारा (डिझाइन थिंकिंग) रुजवणाऱ्या कलाकाराच्या जीवनप्रवासाची कहाणी ‘द डिझाइन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतात अभिकल्प (डिझाइन) आणि अभिकल्प विचारधारा (डिझाइन थिंकिंग) रुजवणाऱ्या कलाकाराच्या जीवनप्रवासाची कहाणी ‘द डिझाइन जर्नी आॅफ प्रोफेसर सुधाकर नाडकर्णी’ या प्राध्यापक सुधाकर नाडकर्णी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई आयआयटीच्या इंडियन डिझाइन सेंटरमधील सभागृहात मुंबई आयआयटीचे माजी संचालक ए. के. डे आणि डॉ. बुरागोहेन यांच्या हस्ते झाले. या वेळी नाडकर्णी यांचे आयआयटीतील सहकारी प्रा. उदय आठवणकर, रवी पूवय्या, ए. जी. राव, के.जी. मुन्शी, जी. जी. रे, विकास सातवलेकर, सुदर्शन धीर हे उपस्थित होते. या वेळी या सर्व सहकाऱ्यांनी चर्चासत्राच्या माध्यमातून नाडकर्णी यांच्या आठवणींना उजाळा दिला.
भारतीय अभिकल्प संस्था (इंडियन डिझाइन सेंटर, आय. आय. टी., मुंबई) ५० वर्षांकडे वाटचाल करत असताना, भारतीय अभिकल्प संस्था आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अशा संस्थांद्वारे अभिकल्प आणि अभिकल्प विचारधारा रुजवणाऱ्या प्रा. सुधाकर नाडकर्णी यांनी ‘द डिझाइन जर्नी आॅफ प्रो. सुधाकर नाडकर्णी’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी भारतातील पहिली भारतीय अभिकल्प संस्था (आयडीसी) कशी तयार केली, तिचा सुरुवातीपासूनचा प्रवास या पुस्तकात मांडला आहे. १९७० साली आयआयटीसारख्या टेक्निकल क्षेत्रात डिझाइन या विषयाचा वेगळा विभाग निर्माण व्हावा ही आश्चर्याची गोष्ट नाडकर्णी यांनी करून दाखवली.
सर्वप्रथम अहमदाबादच्या राष्ट्रीय अभिकल्प संस्थेत (एन.आय.डी.) कार्यरत झालेल्या प्रा. नाडकर्णींनी (१९६६-६९), मुंबईच्या भारतीय तंत्रशिक्षण संस्थेत (आय.आय.टी.) भारतीय अभिकल्प केंद्रात नव्याने सुरू झालेल्या प्रोडक्ट डिझाइन आणि कम्युनिकेशन डिझाइनमधील पदव्युत्तर पदवीच्या शिक्षण प्रणालीला मोठे योगदान दिले (१९६९-१९९७), आणि गुवाहाटीसारख्या मागास भागाच्या प्रगती आणि विकासासाठी नाडकर्णींनी तिथल्या भारतीय तंत्रशिक्षण संस्थेत (आय.आय.टी. गुवाहाटी) भारतीय अभिकल्प केंद्राची स्थापना करत ते नावारूपाला आणले (१९९७-२००३). नाडकर्णी सध्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटमध्ये डिझाइन शाखेच्या अधिष्ठाता पदावर कार्यरत आहेत.
प्रा. नाडकर्णी आणि प्रा. मंदार राणे यांच्यामधील विविध चर्चांमधून ‘द डिझाइन जर्नी आॅफ प्रो. सुधाकर नाडकर्णी’ हे पुस्तक जन्माला आले आहे. मंदार राणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.