कमी भांडवलात यशासाठी समोरच्यांची नावे लक्षात ठेवा; शरद पवारांनी उलगडले राजकारणातील यशाचे गमक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 07:11 AM2021-12-12T07:11:56+5:302021-12-12T07:12:17+5:30
शरद पवार यांनी १९८८ ते ९६ या कालखंडात दिलेल्या भाषणांचा संग्रह असलेले ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी येथील नेहरू सेंटरमध्ये पार पडला.
गौरीशंकर घाळे
राजकारणात कमी कष्टात, भांडवलात यश मिळते. फक्त तुम्ही समोरच्या व्यक्तीचे नाव लक्षात ठेवायला हवे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी त्यांच्या राजकारणातील यशस्वी कारकीर्दीचे गमक उलगडले. निमित्त होते त्यांच्या भाषणांचा संग्रह असलेले ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे.
शरद पवार यांनी १९८८ ते ९६ या कालखंडात दिलेल्या भाषणांचा संग्रह असलेले ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी येथील नेहरू सेंटरमध्ये पार पडला. यावेळी विविध कलाकार आणि मान्यवरांनी पवार यांच्या निवडक भाषणांचे अभिवाचन केले.
एकत्र येऊन प्रत्युत्तर द्या
लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांनी स्त्री-पुरुष भेदभाव आणि महिलांवरील अन्यायाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर पवार म्हणाले की, ज्यांना यातना भोगाव्या लागतात त्यांनी बघ्याची भूमिका घेऊ नये. कालच मुंबईच्या महापौरांना अश्लाघ्य भाषेत पत्र आले. त्यांनी ते लोकांसमोर मांडले. त्यामुळे जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया आली. मुलींनी प्रत्युत्तर द्यायला हवे, सगळ्या मुली एकत्र येऊन प्रत्युत्तर देऊ लागल्या तर कोणी त्यांच्या नादाला लागणार नाही.
खरा इतिहास दडवला जातोय
ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, यांच्यासह कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अर्थतज्ज्ञ विजय केळकर हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते. तर, शरद पवारांसह त्यांच्या पत्नी प्रतिभा, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार सुधीर भोंगळे यांनी पुस्तकाचे संपादन केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेलमधून सोडविण्यासाठी महात्मा गांधींनी खूप प्रयत्न केले होते. हे सत्य जनतेला संघाकडून सांगितले गेले नाही. खरा इतिहास दडवून ठेवला जात आहे. सावरकरांच्या सुटकेसाठी महात्मा गांधी स्वत: व्हाइसरॉयला भेटले. त्यांच्या सुटकेचा ठराव काँग्रेसच्या अधिवेशनात मंजूर करून घेतला, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १९९६ रोजी नागपूर येथे केलेल्या भाषणात सांगितले होते. हे सत्य पुन्हा एकदा पवार यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने समोर आले.