करकरेंचे शौर्य मुंबईकरांच्या अजूनही स्मरणात; दहशतवाद्यांना निधड्या छातीने गेले होते सामोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 09:46 PM2019-04-19T21:46:58+5:302019-04-19T21:47:49+5:30
मुंबईच्या अतिरेकी हल्यावेळी कामा रुग्णालयात शिरलेल्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी तत्कालिनी एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे हे अपुरे सामुग्री आणि शस्त्रे असतानाही निधड्या छातीने दहशतवाद्यांना सामारे गेले होते.
मुंबई - मुंबईच्या अतिरेकी हल्यावेळी कामा रुग्णालयात शिरलेल्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी तत्कालिनी एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे हे अपुरे सामुग्री आणि शस्त्रे असतानाही निधड्या छातीने दहशतवाद्यांना सामारे गेले होते. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी रुग्णालयातील पेंशट व कर्मचाऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपल्या अन्य दोन जॉँबाज अधिकाऱ्यांसह प्राणाची आहुती दिल्याच्या आठवणी मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. त्यावेळची व्हिडीओ व छायचित्रे त्यवेळी त्यांनी दाखविलेले साहस स्पष्ट करते.
काय घडले होते तेव्हा
२६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री समुद्रामार्गे दहा अतिरेकी दक्षिण मुंबईत आल्यानंतर दोघा-दोघाचा गट करुन विविध ठिकाणी जावून गोळीबार सुरु केला. अजमल कसाव व त्याचा साथीदार सीएसटी स्थानकातून घुसून गोळीबार केला. तेथून ते हिमालय ब्रीजवरुन कामा रुग्णालयात गेले होते. साधारण साडेदहाच्या सुमारास त्याठिकाणी गेलेल्या तत्कालिन अप्पर आयुक्त सदानंद दाते व त्यांचे सहकारी हल्यात जखमी झाले. तत्कालिन एटीएसचे प्रमुख करकरे यांना हल्याची माहिती समजल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोहचले होते. हिमालय पुलाजवळ पोलिसांनी बॅरेकटेस लावून मार्ग बंद केला होता. करकरे तेथे पोहचल्यानंतर त्यांनी सहका-याकडून हेल्मेट व जॅकेट घेवून आपल्या अंगावर चढविले. त्याचवेळी तेथे पोहचलेले तत्कालिन अप्पर आयुक्त अशोक कामटे व वरिष्ठ निरीक्षक विजय साळस्कर यांना गाडीत घेवून विशेष शाखेच्या दिशेने निघाले. त्यावेळी परिसरात अंधारात दबा धरुन बसलेल्या अतिरेक्यांनी गाडीच्या दिशेने अंधाधुद गोळीबार केला. कामटे व करकरे यांनीही त्यांच्या दिशेने फायरिंग केले. त्यातील एक गोळी कसाच्या हाताला लागली होती. मात्र त्यांच्याकडून झालेल्या बेंधुद गोळीबारात तिघेही अधिका-यांना हौतात्म्य पत्करावे लागले होते.
अतिरेक्यांना प्रत्यूत्तर देण्यास पुरेसे साधन नसताना आणि निकृष्ट दर्जाचे जॅकेट असतानाही करकरे यांनी थोडीही पर्वा न करता त्यांना सामोरे गेले होते. ती दृष्ये दुरचित्रवाणीवर जगभरात दिसत होती. ती छायचित्रे आजही उपलब्ध आहेत. त्यांनी दाखविलेल्या र्शोयाची दखल घेवून तत्कालिन केंद्र सरकारने अशोक चक्र या सर्वोच्च पुरस्कार मरणोत्तर जाहीर करुन त्यांना सन्मानित केले होते.
हेमंत करकरे यांनी एटीएसचे प्रमुख म्हणून काम करताना अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. त्यांनी केलेल्या निरपेक्ष तपासामुळेच मालेगाव बॉम्बस्फोटातील हिंदुत्वादी विचारसरणीचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. प्रचंड दबाव असतानाही त्यांनी त्याला न जुमानता स्फोटाचा कट रचणाºया साध्वी प्रज्ञासिंग, मेजर श्रीकांत पुरोहित, उपाध्याय व अन्य सहका-यांना अटक केली होती. त्यांच्यावरील कारवाईमुळे हिंदुत्वादी संघटना, संस्थांकडून करकरे यांच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात आले होते. मात्र त्यांच्या दबावाला न जुमानता त्यांनी तपास सुरु ठेवला होता. दुर्दवाने त्याच दरम्यान २६/११ चा हल्ला घडला अन्यथा त्यांच्या कारर्किदीत तपास पुर्ण होवून अतिरेक्यांना शिक्षा मिळाली असती. एटीएसमध्ये जाण्यापूर्वी हेमंत करकरे यांनी मुंबईचे सहआयुक्त (प्रशासन) म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजाविली होती. त्यापूर्वी त्यांनी नागपूर व नक्षलग्रस्त भागात आपल्या कामाचा ठसा उठवला होता.