Join us

गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेंना २००९ ची आठवण; बजरंग सोनवणेंची काढली 'ऐपत'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 4:42 PM

आजचा क्षण माझ्यासाठी भावनिक आणि आनंदी आहे. कारण, २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकांसाठी पंकजाताई उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा मी मुख्य प्रचारक होतो.

मुंबई/बीड -  भाजपाकडून पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकांचं तिकीट जाहीर झालं आहे. त्यानंतर, पंकजा मुंडेंनी प्रचाराला सुरुवात केली असून गावागावात मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं जात आहे. तिकीट जाहीर झाल्यानंतर आज पहिल्यांदाच त्या गोपीनाथ गडावर दर्शनसाठी आल्या होत्या. यावेळी, पालकमंत्री आणि त्यांचे भाऊ धनंजय मुंडे त्यांच्या स्वागताला हजर होते. यावेळी, जे नको घडायला होतं ते घडलं, आता नियतीकडून जे घडतंय ते चांगलंय, असे म्हणत त्यांनी दोन्ही बहिणींच्यासोबत असल्याचं म्हटलं. यावेळी, धनंजय मुंडेंनी नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या बजरंग सोनवणेंनाही इशारा दिला.  

आजचा क्षण माझ्यासाठी भावनिक आणि आनंदी आहे. कारण, २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकांसाठी पंकजाताई उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा मी मुख्य प्रचारक होतो. आता, लोकसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे उभ्या राहिल्या आहेत. ज्या गोष्टी घडू नयेत त्या घडल्या, नियतीने पुन्हा ज्या गोष्टी घडाव्यात, त्या घडवून आणल्या, याचा मोठा भाऊ म्हणून मला आनंद आहे. बाकी ४ जूनला निकालादिवशी मी बोलेन, असे धनंजय मुंडेंनी म्हटले. तसेच, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार असलेल्या बजरंग सोनवणे यांनी नुकताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यासंदर्भात विचारेलल्या प्रश्नावरही त्यांनी परखडपणे उत्तर दिलं. 

"महायुतीतील जे कोणी सोडून गेलं, ते का गेलं, याची कारणं शोधून काढली पाहिजेत. त्यांची अतिमहत्त्वाकांक्षा याला कारणीभूत आहे. मागच्या निवडणुकीत आघाडी म्हणून आम्हीच त्यांचं काम केलं होतं. मात्र त्यांची ऐपत काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यांना आपल्या बहिणीला नगरपंचायत निवडणुकीत निवडून आणता आलं नाही, साधी ग्रामपंचायत निवडणूकही जिंकता आली नाही. जे जाणार होते, त्यांनी अगोदरच तयारी केली होती. आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबले नाहीत. ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. आमचा प्रारब्ध होता, तो आज संपला आहे. आम्ही सगळं कुटुंब आता एकत्र आहोत. आता कुणाचा प्रारब्ध सुरू करायचा ते आम्ही तिघं बहीण-भाऊ ठरवू," असा इशारा मुंडे यांनी दिला.

जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत पंकजा मुंडे यांचं परळीत स्वागत करण्यात आलं. यावेळी पंकजा यांच्यासह धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडेही उपस्थित होत्या. तिघे भाऊ-बहीण अनेक वर्षांनंतर एकत्र आल्याने परळीकरही भारावून गेले. पंकजा यांचं स्वागत करत धनंजय मुंडे यांनी भावुक प्रतिक्रिया दिली. "माझ्यासाठी हा अत्यंत भावनिक दिवस आहे. ताईंना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत जिल्ह्याच्या बॉर्डवरच मी करायला सांगितलं होतं. मात्र ताईंनी सांगितलं की, तू पालकमंत्री आहेस, तू घरी थांब. मी तिथं भेटायला येणार आहे. परंतु मी तिचा मोठा भाऊ आहे आणि त्यामुळे मनाचा मोठेपणाही दाखवला पाहिजे, म्हणून सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून मी स्वागत करण्यासाठी आलो आहे," अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी आपल्या भावना मांडल्या.

दरम्यान, लोकसभेची उमेदवारी मिळाल्या नंतर प्रथमच परळीत आले असता माझा नेता आणि पिता अर्थात लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीवर नतमस्तक होऊन दर्शन घेतले, असे पंकजा यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.

टॅग्स :धनंजय मुंडेपंकजा मुंडेबीडभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस