ओंकार करंबेळकर/ ऑनलाइन लोकमत
मुंबई उपनगरी रेल्वेचे महालक्ष्मी स्थानकापासून वरळी नाक्यापर्यंत जाणारा रस्ता आज शहरातील अनेक गजबजलेल्या रस्त्यांपैकी एक आहे. एकेकाळी हेन्स रस्ता असे नाव असलेल्या या रस्त्याला आता डॉ. इ. मोझेस रोड या नावाने ओळखले जाते. वरळी नाक्यावर रस्त्याचे एक नाव सांगणारी एक पाटी सोडली तर डॉ. मोझेस "नाही चिरा नाही पणती" अशा अवस्थेत जावे इतक्या विस्मृतीत गेले आहेत. डॉ. एलिजाह मोझेस (राजपूरकर) हे मुंबईचे पहिले आणि एकमेव ज्यू धर्मिय महापौर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना सर्वात प्रथम न्यू यॉर्कमध्ये भेटले तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीलाच डॉ. मोझेस हे मुंबईचे महापौर होते अशी माहिती नेत्यानाहूंना दिली. आता पंतप्रधान तीन दिवसांच्या भेटीसाठी इस्रायलला जाणार आहेत. या निमित्ताने डॉ. मोझेस यांच्या कार्याचे स्मरण करण्याची आपल्या सर्वांना संधी मिळाली आहे.
19 व्या शतकाच्या अखेरीस आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीस पुण्या-मुंबईत प्लेगसह साथीच्या अनेक रोगांची धुमाकूळ घातला होता. चटकन पसरणाऱ्या या रोगांनी मुंबईतील कित्येक लोकांचे प्राण घेतले. आचार्य अत्रे यांनी तर `सकाळी काखेत गाठ आली, की दुपारी दारात कडबा-बांबू हजर` असे प्लेगचे वर्णन केले होते. अशावेळेस रोग्यांवर उपचार करण्यासाठी ठामपणे उभ्या राहणाऱ्या लोकांपैकी डॉ. मोझेस होते. त्यांचा जन्म 29 जानेवारी 1873 रोजी अहमदनगर येथे झाला. ज्यू धर्मिय तेव्हाच्या समाजामध्ये शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये अग्रेसर होते. त्यामुळे मोझेस यांनाही शिक्षण घेण्याची संधी मिळाली. भारतीय ज्यू धर्मियांमधील एम.डी पदवी मिळवणारे ते पहिले समजले जातात. डोंगरी परिसरामध्ये त्यांनी आपला दवाखाना सुरु केला. डोंगरी परिसरामध्ये विविध जाती-धर्माचे लोक राहात असल्याने त्या सर्वांनाच डॉक्टरांचा आधार मिळाला. प्लेग आणि इतर साथीच्या रोगांमध्ये उपचार मिळाल्यावर विश्रांतीची गरज असल्याचे ते नेहमीच सांगत. उपचार मिळाल्यानंतर रूग्ण रूग्णालयात राहण्याची गरज नसते मात्र घरी सोडल्यावर शुश्रुषेची गरज असते. गरिब रूग्णांना अशी शुश्रुषा मिळत नाही. त्यामुळे डॉ. मोझेस यांनी हेन्स रस्त्यावरील किंग जॉर्ज इन्फर्मरीमध्ये काम करायला सुरुवात केली. प्लेगच्या रुग्णांची चांगली काळजी येथे घेऊ लागली.
(इस्रायल दौऱ्यामध्ये डॉ. मोझेस फोटो श्रेयः दिवेकर-दांडेकर कुटुंबाचा अल्बम)
प्लेगच्या काळामध्ये केलेल्या सेवेमुळे डॉ. मोझेस सर्वांच्या चर्चेमध्ये येऊ लागले. त्यांच्या समाजसेवेमुळे 1937 ते 1938 या काळामध्ये त्यांना मुंबईचे महापौर होता आले. महापौर झाल्यावरही त्यांच्या मनामध्ये प्लेग निवारणाचेच विषय होते. प्लेगमुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे प्लेग पसरण्यास जास्त हातभार लागतो असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांनी हेन्स रस्त्यावर सर्व धर्मियांना स्मशानांसाठी जागा दिल्या. आज नेहरु तारांगणाजवळ सर्व धर्मांच्या स्मशानभूमी एकमेकांजवळ असण्याचे तेच कारण आहे. 1 जुलै 1957 रोजी डॉ. मोझेस यांचे निधन झाले. ज्या किंग जॉर्ज इन्फर्मरी मध्ये त्यांनी काम केले, ज्या रस्त्यावर त्यांनी स्मशानभूमींना जागा दिल्या, त्याच रस्त्यावरील ज्युईश स्मशानभूमीत त्यांना दफन करण्यात आले. वरळीच्या या स्मशानात मागे एका कोपऱ्यात एकदम साध्या दोन कबरी आहेत. डॉ. एलिजाह मोझेस आणि त्यांची अबिगेल येथेच चिरनिद्रा घेत आहेत.
डॉ. मोझेस यांचे कार्य आजही स्फुर्तीदायी- अॅड. जोनाथन सोलोमन (डॉ. मोझेस यांचे नातू)
डॉ. मोझेस हे त्यांच्या समाजकार्यासाठी ओळखले जातच. त्याप्रमाणे त्यांची पत्नीही पुण्यात हुजुरपागा शाळेच्या सुपरिटेंडंट पदावरती कार्यरत होती. समाजसेवेबरोबर ते ज्यू धर्मियांच्या अनेक चळवळींमध्येही सक्रीय होते. 1940 साली त्यांनी वांद्रे येथे बांधलेल्या घराचे नाव "हतिक्वा" ठेवले. हतिक्वा हे इस्रायलच्या स्वातंत्र्यचळवळीपासून आलेले राष्ट्रगीत आहे. याचाच अर्थ त्यांचा झायोनीस्ट चळवळीशी आधीपासून संबंध होता. झायोनिस्ट कॉंग्रेसमध्येही त्यांनी भाषण केलेले होते. मराठी, इंग्रजी बरोबर हिब्रूही त्यांना अवगत होती. त्यांचा एक मुलगा व एक मुलगी लंडनमध्ये, एक मुलगा इस्रायलमध्ये व एक मुलगी पुण्यात असे स्थायिक झाले.