Join us

विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 5:44 AM

भारतीय हवाई उद्योगाला नवा आयाम देणारे उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि विस्तारा या तिन्ही विमान कंपन्यांनी त्यांना मानवंदना दिली.

नवी दिल्ली: भारतीय हवाई उद्योगाला नवा आयाम देणारे उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर गुरुवारी एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि विस्तारा या तिन्ही विमान कंपन्यांनी त्यांना मानवंदना दिली. या तिन्ही कंपन्यांच्या विमान प्रवासादरम्यान रतन टाटा यांच्या कार्याचे स्मरण करणारी घोषणा करण्यात आली.

गुंतवणूकदारांचा विश्वास

मुंबई : रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहातील कंपन्यांचे शेअर्स काेसळतील, असा अनेकांचा अंदाज हाेता. मात्र, तसे झाले नाही. बहुतांश कंपन्यांचे शेअर्स वधारले. शेअर्स सुरुवातीला टाटा इन्व्हेस्टमेंट, टाटा माेटर्स, टीसीएस, टाटा स्टील, टाटा पाॅवर, टायटन इत्यादी कंपन्यांचे शेअर्स वधारले. बाजार बंद हाेताना त्यापैकी काही कंपन्यांचे शेअर्स घसरले हाेते. मात्र, गुंतवणूकदारांनी समूहावर विश्वास कायम ठेवत एक प्रकारे रतन टाटा यांना आदरांजलीच अर्पण केली.

जमशेदपूर शाेकसागरात

रांची : गेल्या शतकाच्या अखेरच्या वर्षात स्वतंत्र राज्य बनलेल्या झारखंड या मागास भागास आकार देण्यास रतन टाटा यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. टाटा समूहाचे संस्थापक सर जमशेदजी टाटा यांच्या नावाच्या या शहराच्या विकासाला चालना मिळाली ती रतन टाटा यांच्या दूरदृष्टीमुळे. त्यामुळे झारखंडमधील महत्त्वाचे शहर असलेले जमशेदपूर अर्थात टाटा नगर शोकसागरात बुडाले आहे. रतन टाटा यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी झारखंडमध्ये गुरुवारी एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात आला.

गुरुवारी कंपनी सुरू राहिली!

पिंपरी (पुणे) : ‘मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा’, अशी टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची सूचना होती. त्यामुळे पिंपरी आणि चिंचवडमधील टाटा मोटर्सच्या कामगारांनी गुरुवारी कंपनी सुरू ठेवून त्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्याप्रति भावना व्यक्त करताना कामगारांच्या डोळ्यात अश्रू तरळले. औद्योगिक नगरी म्हणून पिंपरी-चिंचवड शहराचा लौकिक जागतिक पातळीवर पोहोचविण्यात टाटा उद्योग समूहाचे योगदान महत्त्वाचे आहे. पिंपरी आणि चिंचवड या दोन ठिकाणी टाटा मोटर्स कंपनीचे प्रकल्प आहेत. 

टॅग्स :रतन टाटाटाटाएअर इंडिया