कृतज्ञताभाव मनात राहणे हाच स्मरणयोग; प्रल्हाद वामनराव पै यांचे व्याख्यान
By स्नेहा मोरे | Published: December 26, 2023 07:46 PM2023-12-26T19:46:12+5:302023-12-26T19:46:43+5:30
प्रत्येकाने सर्वांमुळे मी, सर्वांमध्ये मी आणि सर्वांसाठी मी ही गोष्ट लक्षात ठेवून कृतज्ञतेने सर्वांशी सलोख्याचे संबध ठेवण्यातच खरे शहाणपण आहे.
मुंबई - प्रत्येकाने सर्वांमुळे मी, सर्वांमध्ये मी आणि सर्वांसाठी मी ही गोष्ट लक्षात ठेवून कृतज्ञतेने सर्वांशी सलोख्याचे संबध ठेवण्यातच खरे शहाणपण आहे. यासाठी एकत्र राहा आणि संघटित व्हा. सर्वांमुळे मी, सर्वांमध्ये मी, सर्वांसाठी मी हा कृतज्ञताभाव सतत मनात असणे हाच खरा स्मरणयोग आहे. संसार सुखाचा करण्यासाठी आणि परमार्थ सहज साध्य करण्यासाठी हा स्मरणयोग महत्त्वाचा आहे, असे मार्गदर्शन जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त आणि सदगुरूंचे सुपूत्र प्रल्हाद पै यांनी केले.
जीवनविद्या मिशन या शैक्षणिक, सामाजिक, सेवाभावी संस्थेचे संस्थापक सदगुरू श्री वामनराव पै यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. सदगुरूंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेने केले आहे. नुकताच दुसरा भव्य दिव्य समाज प्रबोधनाचा कार्यक्रम जोगेश्वरीच्या एसआरपीएफ मैदानात मोठया उत्साहात पार पडला. यावेळी, प्रल्हाद पै यांनी सर्वांमुळे मी, सर्वांमध्ये मी आणि सर्वांसाठी मी या विषयावर अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले. यात जीवन जगत असताना एकमेकांवर अवलंबून असतो. एकटा माणूस जगू शकत नाही, एकटा माणूस सुखी राहू शकत नाही, एकटा माणूस यशस्वी होऊ शकत नाही. साहजिकच जोपर्यंत माणूस सर्वांसोबत असतो तोपर्यंत त्याचे अस्तित्व असते. माणसाचे एकट्याचे असे कोणतेच अस्तित्व नाही, असे अधोरेखित केले.
याप्रसंगी, ओघवत्या शैलीतून सदगुरुंच्या जन्मापासून सुरू झालेला हा संपूर्ण जीवनप्रवास सर्वांसमोर अक्षरशः जसाचा तसा उभा केला. या जीवनप्रवासात विविध टप्प्यांवर आधारित सुंदर गाणी देखील यावेळी सादर करण्यात आली. प्रल्हाद पै यांना सारेगमप लिटिल चॅम्स विजेती गौरी गोसावी, मी होणार सुपरस्टारचा उपविजेता राजयोग धुरी, गायिका कांचन सावंत आणि गायक सागर मेस्री या गायकांनी सुरेल साथ दिली. दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सुरूवात हार्मोनियम वादक,५० तबला वादक, ढोल वादक आणि गायकांच्या समुहाने वाद्यवृंदात सादर केलेल्या तालबद्ध अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठ आणि संगीत जीवनविद्येने झाली. त्यानंतर विश्वप्रार्थना सर्वांसोबत सादर करण्यात आली. त्यानंतर सदगुरूंच्या जन्मशताब्दीनिमित्त पै कुटुंबियांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी सामाजिक, उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि इनफ्लुएन्सर शंतनू रांगणेकरही कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.