महावितरणच्या यंत्रणेची होणार पुनर्रचना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 06:02 AM2018-12-13T06:02:48+5:302018-12-13T06:03:10+5:30
ग्राहक सेवेचा दर्जा उंचाविण्यासाठी प्रयत्न; कामगारांची अतिरिक्त कामापासून सुटका
मुंबई : वीज ग्राहकांना तक्रार नेमकी कोणाकडे करायची; याची माहिती मिळावी, त्यांच्या तक्रारींचे वेळेत निरसन व्हावे सोबतच महावितरणच्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा अतिरिक्त ताण कमी व्हावा, ग्राहक सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी महावितरण आता यंत्रणेची पुनर्रचना करणार आहे.
सुरुवातीला हा पथदर्शी प्रकल्प भांडुप आणि कल्याण झोनमध्ये राबविणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांची अंमलबजावणी सर्वत्र करण्यात येईल. बिलिंग करण्यापासून तांत्रिक बिघाड सोडविण्यासह ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणच्या कर्मचाºयांवर ताण येतो आहे. तो कमी करण्यासह कामाचे सुनियोजन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरणच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१९ पासून महावितरणच्या भांडुप आणि कल्याण झोनमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. भांडुपचा विचार केल्यास भांडुप झोनमध्ये सुरुवातीला ठाणे आणि वाशी सर्कलमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल. सूत्रांनी उदाहरणादाखल दिलेल्या माहितीनुसार, चार उपविभागांऐवजी दोन उपविभाग करण्यात आले आहेत. सोबतच ग्राहकांच्या समस्यादेखील लवकरात लवकर सोडवून त्यांना उत्तम सेवा मिळेल. दरम्यान, हा पथदर्शी प्रकल्प कितपत यशस्वी ठरेल, कर्मचारी कितपत प्रतिसाद देतील, हे येणारा काळच ठरविणार आहे.
चारऐवजी आता एकच काम
नव्या यंत्रणेनुसार तीन ते चार कामांची जबाबदारी असलेल्या कर्मचाºयावर एकच काम सोपविले जाईल. त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण कमी होऊन ग्राहकांनाही चांगली सेवा मिळेल़, असा विश्वास महावितरणने व्यक्त केला.