Join us

छत्रपतींचा पुतळा हटवल्याची राज्य सरकारकडून गंभीर दखल; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 9:06 PM

कर्नाटक सरकारने संबंधितांवर कारवाई करुन आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करावी, अशी मागणी सीमाभाग समन्वयक मंत्री छगन भुजबळ आणि माझ्याकडून करत आहे असं एकनाथ शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.

ठळक मुद्देरातोरात हटवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, बेळगावातील मनगुत्ती येथील प्रकार शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट, अनेकांनी कानडी सरकारच्या दडपशाहीचा केला विरोधछत्रपतींचा पुतळा सन्मानपूर्वक पुन्हा बसवावा, राज्य सरकारचं कर्नाटकला पत्र

मुंबई – बेळगावातील मनगुत्ती या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तातडीने या प्रकरणाची दखल घेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडीयुरप्पा यांना पत्र पाठवलं आहे. सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र पाठवून घडलेल्या प्रकाराचा निषेध केला आहे.

या पत्रात मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, बेळगावातील घटनेमुळे महाराष्ट्र-कर्नाटकातील व संपूर्ण देशातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील तमाम शिवप्रेमींमध्ये तीव्र अंसतोष व्यक्त होत आहे. मनगुत्ती गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. तेव्हा तो पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला असल्याची माहिती समोर येत आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

मनगुत्ती ग्रामपंचायतीने पूर्व परवानगीने हा पुतळा बसविण्यात येऊन सुद्धा स्थानिक प्रशासनाने जाणीवपुर्वक आणि सुडबुद्धीने तो रातोरात हटवला. याचा मी निषेध करतो. कर्नाटक सरकारने संबंधितांवर कारवाई करुन आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करावी, अशी मागणी सीमाभाग समन्वयक मंत्री छगन भुजबळ आणि माझ्याकडून करत आहे असं एकनाथ शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.

प्रकरण काय आहे?

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता, गेल्या २ वर्षापासून हा पुतळा बसवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. त्यासाठी सहा महिन्यांपूर्वी चबुतरादेखील तयार केला. या चबुतऱ्यावर गुरुवारी ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. मात्र गावातील काही समाजाच्या लोकांनी याला विरोध केला. त्यांनी छत्रपतींचा पुतळा काढण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे शिवप्रेमी आणि एका गटामध्ये तणाव वाढला, गावातील पुरुष आणि महिला चौथऱ्याजवळ येऊन पुतळ्याला हात लावाल तर याद राखा अशी भूमिका घेतली. तणाव वाढल्याने गावात स्थानिक प्रशासन आणि पोलीस दाखल झाले. गावात ८० टक्क्याहून जास्त मराठी बांधव असल्याने त्यांनी मूर्ती हटवण्यास विरोध केला. पुतळा बसवण्यासाठी पोलीस आणि तहसिलदारांची परवानगी नसल्याचं प्रशासनाने सांगितले. यानंतर ही मूर्ती प्लास्टिकने झाकण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी दोन्ही गटांना समोरासमोर बसवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु शिवाजी महाराजांची मूर्ती न काढण्याची भूमिका मराठी समाजाने घेतली. मात्र शुक्रवारी मध्यरात्री गावातील वीज पुरवठा बंद करुन मूर्ती हटवण्यात आल्याने गावकरी संतापले

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजकर्नाटकएकनाथ शिंदे