Join us

पोलिसांची नाराजी दूर करा !

By admin | Published: March 07, 2016 3:30 AM

पोलिसांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्याच्या घटना आणि त्याबाबत वरिष्ठ अधिकारी व शासनाच्या काहीशा उदासीन भूमिकेमुळे असंतोष वाढत आहे

जमीर काझी,  मुंबईपोलिसांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्याच्या घटना आणि त्याबाबत वरिष्ठ अधिकारी व शासनाच्या काहीशा उदासीन भूमिकेमुळे असंतोष वाढत आहे. सोशल मीडिया आणि अन्य व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोलीस रोष व्यक्त करत आहेत. त्यामुळे खबरदारी बाळगत पोलिसांच्या तक्रारी, नाराजी तत्काळ दूर करा, अन्यथा विपरित प्रतिक्रिया व्यक्त होण्याची भीती असल्याने सावधानतेचा इशारा राज्य गुप्त वार्ता विभागाने (एसआयडी) दिला आहे. राज्यभरातील विविध पोलीस आयुक्तालय/अधीक्षक कार्यालय व अन्य घटक प्रमुखांनी पोलिसांमधील असंतोषाची नोंद घेण्याची गरज आहे. आपल्या अधिपत्याखालील पोलीस ठाणे व शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बैठका घेऊन त्यांच्या अडचणी व समस्यांचे निराकरण करून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना ‘एसआयडी’च्या आयुक्तांनी केल्या आहेत. १९ फेबु्रवारी रोजी लातूर जिल्ह्यात एका सहायक फौजदाराला जमावाकडून बेदम मारहाण करून धिंड काढण्यात आली. त्यानंतर, काही दिवसांनी ठाण्यामध्ये वाहतूक शाखेच्या एका महिला कॉन्स्टेबलला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडूनही मारहाणीची घटना घडली. त्याबाबत संबंधितांवर कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त होत असताना, राज्यभरात अन्य ठिकाणीही पोलिसांना मारहाणीच्या घटना घडल्या. त्याबाबत पोलीस अंमलदारामधून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आता हा रोष तीव्र स्वरूप धारण करत आहे. या रोषाची राज्य गुप्त वार्ता विभागाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार, पोलीस महासंचालकांसह सर्व वरिष्ठ अधिकारी व घटकप्रमुखांना सूचना करण्यात येत आहेत.