तीन दिवसांत बॅनर हटवा; महापालिका मुख्यालयातून २४ वॉर्डांना आदेश, विद्रुपीकरण थांबवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 12:40 PM2023-06-04T12:40:32+5:302023-06-04T12:41:34+5:30

तीन दिवसात हे होर्डिंग प्रशासनाला हटवावे लागणार आहेत.

remove banner within three days an order to 24 ward from the municipal headquarters will stop the defacement | तीन दिवसांत बॅनर हटवा; महापालिका मुख्यालयातून २४ वॉर्डांना आदेश, विद्रुपीकरण थांबवणार

तीन दिवसांत बॅनर हटवा; महापालिका मुख्यालयातून २४ वॉर्डांना आदेश, विद्रुपीकरण थांबवणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सार्वजनिक ठिकाणी बेकायदा होर्डिंग लावू नयेत, असे २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावल्यामुळे राज्यातील शहरे बकाल झाली आहेत. मुंबईचाही त्यात समावेश असून मुंबई विद्रूप करणारे हे होर्डिंग लवकरच नाहीसे होणार आहेत. होर्डिंग हटविण्याचे आदेश पालिका मुख्यालयातून २४ वॉर्डांना देण्यात आले असून तीन दिवसात हे होर्डिंग प्रशासनाला हटवावे लागणार आहेत.

मुंबईतील प्रत्येक नाक्यावर, चौकात तसेच रस्त्याच्या दुतर्फा अनेक बॅनर, होर्डिंग लावण्यात आले आहेत. काही होर्डिंग हे राजकीय पक्षांचे आहेत तर काही होर्डिंग हे अराजकीय आहेत. होर्डिंग, बॅनरसाठी नियमावली तयार असतानाही शुभेच्छा देणारे फलक, बॅनर शहरभर लावले जातात. हे होर्डिंग हटविण्यात यावेत, अशा सूचना पालिका मुख्यालयातून वॉर्ड स्तरावर देण्यात आल्या आहेत. नियमित तपासणी सुरूच ठेवण्यात येईल. याशिवाय सोमवारपर्यंत ही कारवाई पूर्ण करावी लागणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग

दादर, अंधेरी, कांदिवलीसारख्या वर्दळीच्या आणि मोक्याच्या ठिकाणी बेकायदा बॅनर लावण्यात आले होते. तर भायखळा, गोवंडी या ठिकाणी देखील बॅनर्सची संख्या अधिक असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

क्यू आर कोड पद्धतीचा विसर

मुंबईच नव्हे तर राज्यभरातील बेकायदा बॅनर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असून न्यायालयाने हे बॅनर हटविण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. तसेच बॅनर हटविण्यासाठी क्यू आर कोड पद्धतीचा विचार करा, अशा सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मात्र अनेक बेकायदा बॅनरवर क्यू आर कोड दिसत नाही, तसेच अनेक महिने हे बॅनर तसेच असतात.

दैनंदिन कारवाईचा अहवाल सादर करावा लागणार

वॉर्ड कार्यालयांना त्यांच्या हद्दीतील दैनंदिन कारवाईचा अहवाल गुगल फॉर्मवर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास तसेच पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महापालिकेकडे अनेक तक्रारी

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत बेकायदा होर्डिंग्जच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे ही मोहीम हाती घेतल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.


 

Web Title: remove banner within three days an order to 24 ward from the municipal headquarters will stop the defacement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई