ईव्हीएमच्या संशयाचे पिशाच्च काढून टाका - उद्धव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 05:21 AM2018-05-16T05:21:04+5:302018-05-16T05:21:04+5:30
मतपत्रिकेद्वारे मतदान घेऊन एकदाचे ईव्हीएमच्या संशयाचे पिशाच्च काढून टाका, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
मुंंबई : मतपत्रिकेद्वारे मतदान घेऊन एकदाचे ईव्हीएमच्या संशयाचे पिशाच्च काढून टाका, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
कर्नाटकच्या निकालावर माध्यमांना प्रतिक्रिया ठाकरे म्हणाले, जे जे जिंकले, त्यांचे मी अभिनंदन करतो. यात भाजपा असेल किंवा काँग्रेस असेल. आता असे दिवस आले आहेत की, कोणी निवडणुकाचे अंदाज लावू नयेत, कारण तो खोटा ठरतो. भाजपाला प्रत्येक ठिकाणी विजयाचा विश्वास असेल, तर त्यांनीही मतपत्रिकेद्वारे मतदानाचे समर्थन करायला हवे. एकदाचा काय तो फैसला होऊ द्या. म्हणजे ईव्हीएमचे विरोधकही शांत होतील. कर्नाटकात जे कोणी तिथे सत्तेत बसतील, त्यांना त्यांचा आदर द्यावा. ईव्हीएमचे गूढ अजून उकलले नाही, यामुळे संशय पिशाच्च काढून टाकण्यासाठी निवडणुका बॅलेट पद्धतीने झाल्या पाहिजेत. ज्या राज्यामध्ये भाजपाची राजवट नव्हती, तिकडे त्यांना यश मिळाले. मात्र, ज्या राज्यातील लोकांना भाजपाच्या राजवटीचा अनुभव आहे, त्यांचे मत वेगळे असू शकते, असा टोला त्यांनी भाजपाला हाणला.
>पालघरची निवडणूक भावनिक
पालघरमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने दिलेली उमेदवारी हा भावनिक मुद्दा आहे; आणि त्याप्रमाणेच ही निवडणूक लढवून वनगा यांना निवडून आणण्याचा निर्धार करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.
ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते, स्थानिक जिल्हाप्रमुख, जि. प., नगरपालिका सदस्य, ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेतली. भाजपाने वनगांना नकारले, पण शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिल्याने मतदारांमध्येही सहानुभूती आहे. ती मतदानात बदलण्यासाठी जिवाचे रान करा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.