सीप्झ चर्चचा मुद्दा निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 02:47 AM2018-05-16T02:47:38+5:302018-05-16T02:47:38+5:30
अंधेरी येथील सीप्झ परिसरात असलेले सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च हे ५०० वर्षे जुने आहे. या चर्चची स्थापना १५७९ साली झाली.
मुंबई : अंधेरी येथील सीप्झ परिसरात असलेले सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च हे ५०० वर्षे जुने आहे. या चर्चची स्थापना १५७९ साली झाली. या चर्चमध्ये केवळ मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील रविवारी प्रार्थना करण्याची परवानगी मुंबईतील ख्रिश्चन बांधवांना दिली जाते. सद्य:स्थितीमध्ये चर्चची दुरवस्था झाली आहे. तसेच चर्चला हेरिटेज गे्रड-२ दर्जा मिळालेला आहे. राज्य सरकारने चर्चची जागा विनाअधिसूचित (डीनोटीफाईट) केली तर ‘आच डायसिस आॅफ बॉम्बे’च्या ताब्यात चर्च येईल. यासाठी कित्येक वर्षे ख्रिश्चन बांधव सरकारकडे साकडे घालत आहेत. चर्चची जागा एमआयडीसीच्या ताब्यात असून, भाड्याने सीप्झला देण्यात आली आहे. भाडेकरार रद्द करून ती जागा ख्रिश्चन बांधवांना देण्यात यावी, अशी मागणी ख्रिश्चन बांधवांनी केली आहे.
सीप्झच्या ताब्यात असलेले चर्च हे कस्टम नोटीफाय झोनमध्ये आहे. त्यामुळे या चर्चमध्ये जाण्यासाठी वर्षातून एकदा परवानगी दिली जाते. मागच्या काँग्रेस सरकारने एक कमिटी स्थापन केली होती. या कमिटीने आवाहन केले होते की, पुरातन चर्चचे जतन झाले पाहिजे आणि त्याला हेरिटेजचा दर्जा दिला पाहिजे. तसेच चर्च धर्मगुरूंच्या स्वाधीन केले पाहिजे. सरकारने योग्य ती कारवाई करून ‘आच डायसिस आॅफ बॉम्बे’ यांच्या ताब्यात चर्च द्यावे. चर्चचे सातबाराचे उतारे अजूनही धर्मगुरूंच्या नावे आहेत. तरीही ख्रिश्चन बांधवांना चर्चमध्ये प्रार्थना करण्यास मज्जाव केला जातो, अशी माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा यांनी दिली.
अल्मेडा म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जाऊन चर्चचा मुद्दा मांडण्यात आला होता. त्या वेळी ठाकरे यांनी संजय निरुपम यांच्याशी बोलून हा मुद्दा राज्यसभेत मांडण्यास सांगितले. राज्यसभेत मुद्दा मांडल्यावर चर्चकडे लक्ष देण्यात आले. त्या वेळी ख्रिस्ती बांधवांना प्रार्थना करण्यासाठी गेट क्रमांक ५ हे नवीन प्रवेशद्वार बांधून देण्यात आले. सध्या चर्चवर छत नाही. चर्चला चहूबाजूने झाडांचा वेढा पडला आहे. त्यामुळे भिंती अजूनही उभ्या आहेत. तसेच चर्चच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले आहे. मुंबईतले सर्वांत जुने चर्च म्हणून याची ख्याती आहे. चर्च मुंबईतल्या सर्व ख्रिस्ती बांधवांसाठी खुले करावे, अशी मागणी ख्रिश्चन बांधवांनी केली आहे.
>चर्चचा इतिहास
पोर्तुगीजांनी १५व्या शतकात हे चर्च बांधले. पोर्तुगीज धर्मगुरू जेसूएटस् हे १५७९ साली ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी सीप्झ येथे चर्च बांधले. तिथे कोंडीविटा गाव होते. १८७० साली प्लेग रोगाची साथ आली. प्लेगची साथ आल्यावर चर्चचे स्थलांतर करण्यात आले. चर्चमधील सेंट जॉन बाप्टिस्ट यांचा पुतळा आणि लाकडामध्ये कोरीव काम केलेले साहित्य मरोळ चर्चमध्ये स्थलांतर करण्यात आले. १५९७ सालापासून लाकडाचे कोरीव काम अजूनही मरोळच्या चर्चमध्ये सुस्थितीत आहे.