मुंबई/जालना - मराठाआरक्षणाच्या आंदोलनासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालन्यात सभा घेऊन सरकारला इशारा दिला. तसेच, भुजबळ आणि मराठवाड्यातील काही नेत्यांवर जोरदार निशाणाही साधला. यावेळी, त्यांनी आमदार नारायण कुचेंचा उल्लेख करत धनंजय मुंडेंवर आरोपही केले. त्यावर, आता कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझी जुनी भाषणं काढून बघा, मी नेहमीच मराठाआरक्षणाचं समर्थन करत मराठा आरक्षणाची मागणी केल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, कुचेंनी माझ्याबद्दल काय व कशामुळे सांगितलं, हे मला माहिती नाही, असेही ते म्हणाले.
जरांगे-पाटील यांनी जालन्यातील सभेतून भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यावरही हल्लाबोल केला. आंदोलनादरम्यान मध्यस्थीस तुम्ही आले होते; परंतु त्यांना दोन नावे कोणी दिली. बीडमधील मराठा बांधवांना धनंजय मुंडे गुंतवत असल्याचे आ. कुचे यांनी फोनवर सांगितल्याचा आरोप करत एमसीआरचा पीसीआर तुम्ही दोघांनी करायला लावला, असा संशय असल्याचे म्हटले. जरांगेंच्या या विधानावर आता धनंजय मुंडेंनीही स्पष्टीकरण दिलं आहे.
बीडमधील घटनेच्या व्हीडिओ, सीसीटीव्ही फुटेज इत्यादी जे पुरावे सापडले त्यावरून काहींना अटक झाली आहे. पुढील तपासात ते निष्पन्न होईलच. पण मी स्वतः याला अडकवा, त्याला गुंतवा असे सांगण्याचे किंवा तसे आदेश शासकीय यंत्रणांना देण्याचे काही कारणच नाही किंवा तो अधिकारही मला नाही, असे धनंजय मुंडेंनी म्हटले. तसेच, आ.नारायण कुचे यांनी माझ्याबद्दल जरांगे पाटील यांना काय सांगितले व कशामुळे सांगितले हे मला माहित नाही. बीड जिल्ह्यात मी मला कळते तेव्हा पासून १८ पगड जातींना सोबत घेऊन सामाजिक व राजकीय वाटचाल करत आहे. आज मराठा समाजासह इतर सर्वच समाज आम्ही सर्व बीड जिल्हावासीय म्हणून गुण्या-गोविंदाने नांदतो. एकमेकांच्या सुख-दुःखात आम्ही कायम सोबत असतो, असेही मुंडेंनी म्हटले.
माझी जुनी भाषणं काढून बघा
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नी पोटतिडकीने लढत आहेत, त्यांचा आम्हाला आदर व आपुलकी आहे. म्हणूनच सरकारच्या शिष्टमंडळात मी स्वतः त्यांना भेटायला गेलो व उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मी स्वतः २००२ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या लढ्यात सहभागी आहे, तेव्हा आरक्षणाच्या लढ्याची एवढी धग नव्हती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबतची माझी जुनी भाषणे काढून बघा, मी तेव्हा आणि आत्ताही मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या भूमिकेवर ठाम आहे.
२००७ साली मी बीड जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पाठिंब्याचा महाराष्ट्रातील पहिला ठराव बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मांडला होता. मराठा क्रांती मोर्चाने काढलेल्या क्रांती मोर्चात मी स्वतः मराठा बांधवांच्या बरोबरीने सहभागी झालेलो आहे. विधिमंडळाच्या विविध अधिवेशनांमध्ये सर्वाधिक आवाज उठवणारा व भाषणे करणारा मी देखील या लढ्यातला एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे समाजाला आरक्षण मिळावे, याबाबत माझ्या मनात कुठलेही किंतु परंतु नाही, हे सर्वांनाच माहीत आहे.
बीड जिल्ह्यात ३० ऑक्टोबर रोजी जी जाळपोळ आणि घरांवर हल्ले झाले, त्याचे समर्थन कोणीही करू शकत नाही. स्वतः जरांगे पाटलांनी सुद्धा हिंसक आंदोलनाला विरोध केलेला आहे. त्या जाळपोळीच्या घटनांमध्ये कोणीही आरक्षणाचे आंदोलक नव्हते तर त्या आंदोलनाला बदनाम करू पाहणाऱ्या काही राजकीय शक्ती होत्या, असा दाट संशय सर्वानाच आहे. त्यादृष्टीने पोलीस व प्रशासन तपास करत आहेत.