लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील ६८ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. यापैकी गांधीनगर आणि भोपाळ स्थानकाचा विकास करण्यात आला असून, मुंबईसह राज्यातील इतर स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यात येणारे अडथळे दीड महिन्यात दूर करा, असे आदेश रेल्वे राज्यमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या वेळी दानवे म्हणाले, भोपाळ गांधीनगरच्या धर्तीवर मुंबई सीएसएमटी, दादर, मुंबई सेंट्रल, ठाणे, पुणे, कोलकाता, लखनऊ या स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. यात राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना काही अडचणी आहेत. आम्हाला मुंबई पोर्ट ट्रस्टमधून काही जागा हव्या आहेत. त्या जागा मिळण्यात अडचणी आहेत. एमएमआरडीए आणि महापालिकेचे, राज्य सरकारचे काही प्रश्न आहेत. या सर्व प्राधिकरणांची आज बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. सर्वांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. दीड महिन्यात हे प्रश्न मार्गी लावण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्यानंतरही काही अडचणी असतील तर मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत चर्चा करून या ६८ स्थानकांसोबत मुंबईचाही विकास केला जाईल, असे ते म्हणाले.
ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना एसी लोकल कमी दरात उपलब्ध करून देण्याबाबत ते म्हणाले, केंद्र सरकारची कोणत्याही प्रकारची अडचण नाही. राज्य सरकारने विनंती केल्यास केंद्र सरकार परवानगी देण्यास तयार आहे. राज्य सरकारने रेल्वे प्रवासाबाबत नियम केले आहेत. लसीचे दोन डोस घेऊन चौदा दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे. आता मासिक पास देण्यात येत आहे. राज्य सरकारने कोणत्या वर्गाला रेल्वे प्रवासाची मुभा द्यायची हे सांगावे. त्या वर्गाला रेल्वे प्रवासाची मुभा देण्यास केंद्र सरकार तयार आहे.
आमचे सरकार नसताना लालू प्रसाद यादव, सुरेश कलमाडी यांची चौकशी करण्यात आली. त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. काँग्रेसने त्यांच्यामागे ईडी, सीबीआय लावली होती. ईडी, सीबीआय त्यांचीच देण आहे. एखाद्याची ईडी चौकशी होत असेल आणि त्या व्यक्तीने काही केले नसेल तर कोणालाही घाबरण्याचे कारण नाही, असे दानवे या वेळी म्हणाले.