पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढा

By admin | Published: June 5, 2016 03:14 AM2016-06-05T03:14:38+5:302016-06-05T03:14:38+5:30

बदलत्या काळानुरूप गिरगावचे रुपडेही पालटू लागले आहे. चाळ संस्कृती जाऊन टॉवर संस्कृती रूजू लागली आहे. मुंबईतील मोक्याची जागा असणाऱ्या या ठिकाणाहून मेट्रो ३ चा प्रकल्पही उभा

Remove the question of rehabilitation | पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढा

पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढा

Next

‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रम : मेट्रो प्रकल्पामुळे गिरगावकरांना चिंता

मुंबई : बदलत्या काळानुरूप गिरगावचे रुपडेही पालटू लागले आहे. चाळ संस्कृती जाऊन टॉवर संस्कृती रूजू लागली आहे. मुंबईतील मोक्याची जागा असणाऱ्या या ठिकाणाहून मेट्रो ३ चा प्रकल्पही उभा राहणार आहे, पण या मेट्रोचा प्रकल्प नक्की गिरगावकरांना फायद्याचा ठरणार की नाही, याविषयी गिरगावकरांच्या मनात साशंकता आहे. याचबरोबर, महिला सुरक्षा, मराठी शाळा आणि अन्य समस्या गिरगावकरांनी ‘लोकमत आपल्या दारी’ या व्यासपीठावर मांडल्या.
गिरगावातील क्रांतिनगर येथे झालेल्या कार्यक्रमाला गिरगावकरांनी उपस्थित राहून, त्यांची गाऱ्हाणी ‘लोकमत’समोर मांडली. या वेळी व्यासपीठावर नगरसेवक सुरेंद्र बागलकर, सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा हिर्लेकर, क्रांतिनगर उत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी रहाणे, क्रांतिनगर उत्सव समितीचे उपाध्यक्ष विलास दळी, तसेच ‘लोकमत’चे वितरण विभागाचे व्यवस्थापक शरद सुरवसे, सहायक वितरण व्यवस्थापक संजय पाटील यांच्यासह संपादकीय विभागाचा चमू उपस्थित होता. मेट्रो रेल्वे, पुनर्विकास आणि सुरक्षा या विषयी प्रामुख्याने चर्चा झाली.
गिरगावातून मेट्रो प्रकल्प जाणार आहे. या प्रकल्पाविषयी गिरगावकरांना स्पष्ट कल्पना दिली नाही. आम्हाला दुप्पट घर मिळेल, पण नक्की कुठे मिळणार हे स्पष्ट नाही. आता त्यांनी जीआर काढावा. जीआर निघत नाही, तोपर्यंत आम्ही हलणार नाही, असे मत गिरगाव काळबादेवी कृती समिती मेट्रो सदस्य आणि
क्रांतिनगर उत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी रहाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

पार्किंगची जागा गायब
गिरगावकरांसाठी महानगरपालिकेने वाहन पार्किंग इमारत बांधण्यासाठी ३१४, ३१५ वैद्यवाडी, ठाकूरद्वार येथील भूखंड राखीव ठेवले होते. या भूखंडावरबहुमजली वाहन पार्किंग सुविधा करण्यात येणार होती. एका बिल्डरने या भूखंडावर वैद्यवाडीबाहेरील लोकांसाठी आणि विकण्यासाठी असे ३ टॉवर बांधण्याचे ठरवले आहे आणि कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी प्रत्येक टॉवरच्या बेसमेंटची जागा हा बिल्डर महापालिकेला पार्किंग लॉटसाठी देणार आहे. महापालिकेने स्वत: ३१४ या भूखंडावर बहुमजली कार पार्किंग बिल्डिंग बांधावी, अशी अपेक्षा असल्याचे स्थानिक प्रवीण धोत्रे म्हणाले.

बेस्टची कामात दिरंगाई
मुख्य वीजवाहिनीच्या कामासंदर्भात बेस्ट कार्यालयात गेल्या कित्येक महिन्यांपासून खेपा घालत आहोत, पण अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. कोळीवाडी येथील १२६ कुटुंबाचा प्रश्न आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, तरीही कामात दिरंगाई होत आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून न्याय मिळेल, अशी आशा श्रीहरी इंगळे यांनी व्यक्त केली.

एसआरझेडची मर्यादा नक्की किती?
एसआरझेडची नक्की मर्यादा किती? असा प्रश्न विनय बांदेकर यांनी उपस्थित केला. १९९५ साली शासनाने रिडेव्हलपमेंटची सुरुवात केली. आजूबाजूच्या ठिकाणी लोकांना सुविधा मिळत आहेत, पण क्रांतिनगर हे सीआरझेडमध्ये येते. त्यामुळे इथे काहीच होत नाही, दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे नक्की सीआरझेडची मर्यादा स्पष्ट करावी, असे बांदेकर यांनी सांगितले. सीआरझेडची जागा आहे, तर मग येथून मेट्रो कशी जाते, असा प्रश्न रुपाली पाटणकर यांनी उपस्थित केला.

पुनर्विकासात फसवणूक
मेट्रोबरोबरच रिडेव्हलमेंटचा विषय मांडताना, गिरगाव परिसरात चाळी पाडून टॉवर्स बांधण्यात येत आहेत, पण यात मराठी माणसांची आणि व्यावसायिकांची फसवणूक होत आहे. रस्त्यावर असणाऱ्या दुकानांना आत दुसऱ्या मजल्यावर बिल्डर जागा देत आहेत. कमर्शिअलची जागा असून, रेसिडंट भागात त्यांना जागा दिली जात आहे. हे थांबायला हवे, असे मत प्राजक्ता धोत्रे यांनी मांडले.

नगरसेवक सुरेंद्र बागलकर म्हणतात की...
मेट्रोविषयी मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी सहमत आहे, पण माझे वैयक्तिक मत वेगळे आहे. मेट्रो स्टेशन जेथे होईल, त्यांचेच पुर्नवसन होईल असे नाही, तर ज्या मार्गातून मेट्रो जाणार आहे, तेथील रहिवाशांचेही पुनर्वसन होणार आहे. नोकरदार महिलांसाठी चर्नीरोड स्थानकाजवळ मुलांसाठीचे एक संगोपन केंद्र बांधण्यात येणार आहे. महिलांसाठी विरंगुळा केंद्र बांधण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. लोकांनी फेरीवाल्यांकडून घेणे बंद केले पाहिजे. गल्लीतील गटारे साफ करणारे ७० टक्के कामगार जखमी होतात. कारण वरून कचरा टाकला जातो. हाउस गल्ली साफ केली जाते, पण काही दिवसांनी परत तिथेच लोक कचरा टाकतात. तो सगळा निधी फुकटच जातो. मराठी शाळांसाठी नक्कीच मदत केली जाईल.अजून काही समस्या असतील तरी सांगा, मी ते काम करून देईन, असे नगरसेवक सुरेंद्र बागलकर यांनी सांगितले

मराठी शाळा वाऱ्यावर : गिरगाव ही मराठी वस्ती असूनही येथे मराठी शाळा ओस पडल्या आहेत. शारदा सदन मध्ये ८ वी, ९ वी आणि १० वीचे तीन वर्ग आहेत, पण शिक्षकेतर कर्मचारी नाहीत. त्यामुळे कोणत्या शिक्षकावर कोणती जबाबदारी टाकायची, हा प्रश्नच असतो येत्या काळात मुख्याध्यापक पदही जाणार आहे. दक्षिण मुंबईत राज्याचे शिक्षणाच्या संदर्भातले निकष लावल्यास शिक्षक राहणार नाहीत. आमची शाळा ही अनुदानित आहे. त्यामुळे येथे प्रशासकीय कर्मचारी असतात. त्यामुळे येथे सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करावी, अशी मागणी आहे. मराठी शाळा सुरू राहण्यासाठी विशेष प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचे मत आर्यन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमोद उसपकर यांनी मांडले.

Web Title: Remove the question of rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.