आरएमएस सोसायटीतील ‘जीओ’चा टॉवर अँटिना १५ दिवसात हटवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:08 AM2021-08-19T04:08:47+5:302021-08-19T04:08:47+5:30
गौरी टेंबकर - कलगुटकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दहिसरमधील आरएमएस सोसायटीत जिओ कंपनीकडून लावण्यात आलेला ‘टॉवर अँटिना’ ...
गौरी टेंबकर - कलगुटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहिसरमधील आरएमएस सोसायटीत जिओ कंपनीकडून लावण्यात आलेला ‘टॉवर अँटिना’ पंधरा दिवसात हटविण्याचे निर्देश पालिकेच्या आर/उत्तर विभागाकडून देण्यात आले आहेत. याबाबत काही कल्पना नसल्याचे जरी कंपनीचे म्हणणे असले तरी त्यांच्या अनधिकृत कामामुळे आता सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या डोक्याला नसता मनस्ताप झाला आहे.
दहिसर पूर्वच्या आनंदनगर येथे असलेल्या बी-२८/२९ या इमारतीमध्ये हा टॉवर अँटिना बॅटरीसह जिओ कंपनीकडून बसविण्यात आला आहे. यासाठी संबंधित विभागाकडून आवश्यक असलेली कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यानुसार पालिकेच्या आर/उत्तर विभागाकडून या सोसायटीच्या अध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली असून, ती मिळाल्याच्या अवघ्या पंधरा दिवसात हा अनधिकृत टॉवर काढून टाकण्याची सक्त ताकीद पालिकेने त्यांना दिली आहे.
सहसा सोसायटीला अशा कामांमुळे वार्षिक रक्कम कंपनीकडून मिळते. ज्याचा वापर सोसायटीतील सुधारकामांसाठी केला जातो. मात्र, आता या अँटिना टॉवरबाबत कंपनीने योग्य ती औपचारिकता पूर्ण न केल्यामुळे नाहक भुर्दंड सोसायटीला भरावा लागणार आहे, याची चिंता सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना सतावत आहे.
‘मला या विषयाबाबत काहीच कल्पना नाही.’ ( जितेंद्र सिंग - प्रादेशिक अधिकारी, जिओ कंपनी )
बैठकीत व्यस्त आहे
‘सध्या मी एका बैठकीत व्यस्त असून, याबाबत नंतर आपल्याशी बोलते.’ (मृदुला अंडे - सहाय्यक आयुक्त, आर/उत्तर विभाग)
फोटो: आरएमएस सोसायटीवर अनधिकृत टॉवर अँटिना बसविण्यात आला आहे.