Join us

‘टॅब’ची श्वेतपत्रिका काढा

By admin | Published: September 08, 2016 3:46 AM

महापालिकेच्या विद्यार्थ्यांना टॅब वितरित केल्यानंतर तब्बल वर्षभराने टॅबसाठीे चार्जर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र या कालावधीनंतर चार्जर उपलब्ध होणार असले तरी टॅब नादुरुस्त आहेत.

मुंबई: महापालिकेच्या विद्यार्थ्यांना टॅब वितरित केल्यानंतर तब्बल वर्षभराने टॅबसाठीे चार्जर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र या कालावधीनंतर चार्जर उपलब्ध होणार असले तरी टॅब नादुरुस्त आहेत. परिणामी वर्षभरात किती विद्यार्थ्यांनी टॅबवर धडे गिरवले, आणि किती टॅब नादुरुस्त आहेत आणि या योजनेचा फायदा किती विद्यार्थ्यांना झाला? असे प्रश्न उपस्थित करत याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत करत मनसेने शिवसेनेला कोंडीत पकडले.शिवसेनेने पालिका शाळांतील तब्बल २१ हजार विद्यार्थ्यांना वर्षभरापूर्वी टॅब वितरित केले. महत्त्वाचे म्हणजे हे टॅब विद्यार्थ्यांनी घरी न्यायचे की शाळेत ठेवायचे? याचा निर्णय घेण्यास प्रशासनाला वर्ष लागले. परिणामी टॅब चार्जरचा मुद्दाही रखडला. आता टॅबसाठी चार्जर उपलब्ध होणार असले तरी निम्मे टॅब नादुरुस्त आहेत. काही टॅब दुरुस्तीसाठी टाकण्यात आले असले तरी तेही दुरुस्तीविना पडून आहेत. परिणामी शिवसेनेने वचनपूर्तीसाठी टॅब वितरित केले असले तरी वचपूर्ती झाली का? असा प्रश्न मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी बैठकीत उपस्थित केला. ज्या उद्देशाने विद्यार्थ्यांना टॅब वितरित करण्यात आले; तो उद्देश सफल झाला का, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी झाले का, टॅबवर किती धडे अपलोड करण्यात आले? या प्रश्नांची सरबत्ती करत देशपांडे यांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली.दरम्यान, मनसेच्या प्रश्नांना शिवसेनेला बैठकीत ठोस उत्तर देता आले नाही. तरीही वर्षभरानंतर टॅब चार्ज करण्यासाठी महापालिका शाळांत स्पाईक गार्डकरिता ९१ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. दुसरीकडे पालिकेने ही योजना राबवण्यासाठी अकरा कोटी रुपये खर्च केले आहेत. यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे तर नादुरुस्त टॅबसाठी कोटींच्या खर्चावरून आता सेना आणि मनसेमध्ये जुंपली आहे.