Join us  

परवानगी नाकारलेल्या नव्या मेडिकल कॉलेजबाबतच्या त्रुटी दूर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 7:01 AM

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील विविध १० जिल्ह्यांत कॉलेजेस सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे अर्ज केला होता. मात्र, आयोगाच्या अंतिम तपासणीत काही त्रुटी आढळल्याने त्यांनी नऊ कॉलेजेसना परवानगी नाकारली होती. मुंबईतील एका कॉलेजला परवानगी दिली होती. मात्र, परवानगी नाकारलेल्या नियोजित कॉलेजेसबाबतीतील त्रुटी दूर करण्यात येणार असून, त्याकरिता अपिलात जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिली.

याकरिता राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात नवीन मेडिकल कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या तज्ज्ञांची समिती विविध महाविद्यालयांत तपासणीसाठी आली होती. मात्र, प्रत्यक्षात तपासणी करतेवेळी या सदस्यांना काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी शासनाच्या नऊ कॉलेजेसना परवानगी नाकारल्याचे पत्र ४ जुलै रोजी पाठविले होते. त्यापैकी मुंबई येथे ५० विद्यार्थी क्षमतेचे कॉलेज उघडण्यास परवानगी दिली आहे.

मुश्रीफ यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता जिल्हा गडचिरोली, जालना, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नाशिक, भंडारा, अंबरनाथ (जिल्हा ठाणे) आणि मुंबई (१० संस्था) येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे एमबीबीएस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याकरिता राष्ट्रीय वैद्यक परिषद, नवी दिल्ली यांना अर्ज सादर करण्यात आले होते. त्रुटींची पूर्तता करण्याची कार्यवाही शासन व संचालनालय स्तरावर सुरु आहे. अध्यापकांची पदे भरण्याची कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सुरु असून, वैद्यकीय महाविद्यालयांची इमारत आणि संलग्नित रुग्णालय या संदर्भातील कार्यवाही पूर्ण झालेली आहे. तसेच काही अध्यापकांची पदे कंत्राटी, मानधनावर भरण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातील जनतेसाठी मोठ्या संख्येने डॉक्टर उपलब्ध व्हावेत, त्रुटी पूर्तता करण्यासंदर्भात हमीपत्र सादर करून नव्या महाविद्यालयांना परवानगी मिळवण्यासाठी योग्य प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या नीट-युजी- २०२४ ची परीक्षा पुढे गेल्यामुळे नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी घेऊन चालू शैक्षणिक वर्षी एमबीबीएस प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरु आहेत - हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

टॅग्स :मुंबईहसन मुश्रीफडॉक्टरवैद्यकीय