नियुक्त्या देऊन नेत्यांची नाराजी दूर; शिरसाट सिडकोचे अध्यक्ष, आयोगाच्या अध्यक्षपदी अडसूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 08:37 AM2024-09-17T08:37:52+5:302024-09-17T08:38:46+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत नेत्यांची नाराजी नको म्हणून शिंदे यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना आणि राज्य सरकारचा कार्यकाळ संपत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील नाराज नेत्यांच्या महामंडळ आणि आयोगावर नियुक्त्या करून त्यांची नाराजी काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नेत्यांची नाराजी नको म्हणून शिंदे यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
औरंगाबाद पश्चिमचे शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास विभागाने सोमवारी शासन निर्णय जारी केला. मंत्रिपदासाठी आग्रही असणाऱ्या शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदी नेमून मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. हिंगोलीतून उमेदवारी नाकारण्यात आलेले माजी खासदार हेमंत पाटील यांची हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.