Join us  

माने जवळील दीड किलोची गाठ काढली; सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

By संतोष आंधळे | Published: October 07, 2023 9:24 PM

साडेसहा तास ही शस्त्रक्रिया सुरु होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  मानेवर गाठ असल्याची आरोग्य समस्या काही व्यक्तींना असते. अन्वर खान या १५ वर्षाचा मुलाच्या मानेवर सुद्धा एक गाठ होती. त्या गाठीवर योग्य वेळी उपचार न केल्यामुळे ती गाठ दीड किलोची झाली. त्याला उपचारकरिता सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयातील डॉक्टरांनी सर्व चाचण्या आणि  योग्य निदान करून त्या मुलाच्या मानेवरील ही गाठ शस्त्रक्रिया काढून यशस्वी शस्त्रक्रिया केली. साडेसहा तास ही शस्त्रक्रिया सुरु होती.  त्यानंतर त्या अन्वरची तब्बेत सुधारत असल्याचे  डॉक्टरांनी सांगितले. 

बुधवारी अन्वर वर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ही गाठ २२ सेंटीमीटर बाय ३० सेंटीमीटर इतकी मोठी होती. त्यामुळे रुग्णाची श्वासनलिका मूळ जागेपासून उजव्या बाजूला पूर्णपणे झुकली होती. रक्ताच्या चाचण्या आणि एम आर आय करण्यात आला. ही गाठ मानेतील एक मुख्य रक्तवाहिनी म्हणजेच  ( इंटर्नल जुगलर व्हेन ) या शिरेपासून वाढत होती. 

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी प्लस्टिक सर्जन, सी वि टी एस सर्जन, रेडिलॉजी आणि भूलतज्ज्ञानी सखोल चर्चा करून त्यातील धोके अधोरेखित करून संभाव्य धोक्याची रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. त्यांची संमती घेतल्यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान गळ्याभोवती असणाऱ्या इतर अतिशय महत्त्वाच्या रक्तवाहिन्या, मांसपेशी याना कुठेही धक्का न लावता कौशल्याने ही शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली.       या शस्त्रक्रियेसाठी प्लास्टिक सर्जन डॉ मुकूंद जगन्नाथन, डॉ अमरनाथ मुनोळी, सी वी टी एस सर्जन डॉ जयंत खांडेकर, रेडिओलॉजिस्ट डॉ विवेक उकिर्डे आणि भूलतज्ज्ञ डॉ शकुंतला बसंतवानी यांचा सहभाग होता.

टॅग्स :हॉस्पिटल