मेट्रोचे बॅरिकेट्स काढून वाहतूक सुरळीत करणार, प्रविण दराडे यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 05:15 PM2018-08-31T17:15:19+5:302018-08-31T17:16:09+5:30
मेट्रोच्या कामामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बसविण्यात आलेल्या बॅरिकेटमुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असली तरी येथील वाहतूक सुरळीत चालावी यासाठी ज्या ज्या ठिकाणी मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे.
मुंबई : मेट्रोच्या कामामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बसविण्यात आलेल्या बॅरिकेटमुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असली तरी येथील वाहतूक सुरळीत चालावी यासाठी ज्या ज्या ठिकाणी मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तेथील बॅरिकेट्स लवकरच काढण्यात येतील. अद्याप ६० टक्के बॅरिकेट काढण्यात आले असून उर्वरित बॅरिकेट्सही मार्च २०१९ पर्यंत काढण्यात येईल. यामुळे वाहतुक अधिक सुरळीत सुरू राहण्यास मदत होईल, असे आश्वासन मेट्रोचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांनी गृहनिर्माण उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना दिले.
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुक मेट्रोच्या कामामुळे वाढलेल्या वाहतुक कोडींमुळे स्थानिक जनतेला तसेच वाहनचालकांना होणार्या त्रासबाबत राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी जोगेश्वरी आर.टी.ओच्या कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला नगरसेविका साधना माने, प्रविण शिंदे, बाळा नर, रेखा रामवंशी, विश्वनाथ सावंत, कैलाशनाथ पाठक, रचना सावंत, शालिनी सावंत, मेट्रोचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे, मेट्रोचे संचालक मुर्ती, मुख्य अभियंता भोसले, वाहतूक विभाग, महापालिका, सार्वजनिक बांधकाम, पोलीस विभाग तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.
यावेळी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील वाढत्या वाहतुक कोंडीमुळे स्थानिक जनतेला तसेच वाहनचालकांना होणार्या त्रासाची माहिती राज्यमंत्री वायकर यांनी दिली. त्याचबरोबर येथील एग्झिबिशन सेंटर येथील प्रदर्शनामुळे याला भेट देणार्यांच्या गाड्या रस्त्यावर बेधडकपणे पार्क करण्यात येत असल्याचेही अधिकार्यांच्या निदर्शनास आणून याप्रश्नी तीव्र नाराजी व्यक्त केली. जोगेश्वरीतील रस्त्याच्या दोन्ही बाजुला उभ्या राहणार्या अनधिकृत गाड्यांवर तसेच अनधिकृत गॅरेजवर कारवाई करण्याचे निर्देश वाहतुक विभागाला दिले. त्याचबरोबर जोगेश्वरी पुर्व-पश्चिम जोडलेल्या पुलाचा विस्तार वेरावली पर्यंत करण्यासाठी निधी असताना निव्वळ मेट्रोच्या कामामुळे याला विलंब होत असल्याचे वायकर यांनी मेट्रोच्या अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणले. त्याचबरोबर निधी असूनही पंप हाऊस तसेच संजय गांधी नगर येथील भुयारी मार्गाचे काम भुमिपुजन होऊनही रखडल्याने या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली.
याला उत्तर देताना मेट्रोच अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांनी,‘ज्या ज्या ठिकाणी मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे, तेथील पिलर तात्काळ काढण्यात येऊन वाहतुक सुरळीत करण्यात येईल. त्याचबरोबर सध्या येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पेवर बॉक्स बसविण्यात आले आहे, ते देखील पावसाळा संपल्यानंतर काढळ्यात येतील व खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
पारसी पंचायत येथील भुयारी मार्गाचे काम सप्टेंबरपासून सुरू करण्यात येईल अंधेरी येथील भुयारी मार्गाचे कामही लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वास दराडे यांनी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना दिले. ज्या ज्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे त्या त्या ठिकाणी जेथे लाईट नाही आहेत तेथे दोन दिवसांमध्ये फ्लड लाईट लावण्यात येतील. त्याचबरोबर जोगेश्वरी पुर्व-पश्चिम जोडणार्या उड्डाणपुलाचा वेरावलीपर्यंत विस्तार करण्यासाठी टाकण्यात येणार्या महत्वपुर्ण अशा मेट्रो आणि प्लायओवरच्या एकाच पिलरचे काम पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही दराडे यांनी यावेळी दिली. पावसाळा संपल्यानंतर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टेही मारण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी राज्यमंत्री वायकर यांना दिले. जोगेश्वरी जंक्शन येथे भुयारी मार्गाच्या कामासाठी सल्लागाराची नेमणुक करण्यात आली असून लवकरच याचे टेंडर करुन काम सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.